IND vs ENG 4th Test Day 2: 8 महिन्यानंतर टेस्ट खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या उमेश यादवने शानदार कमबॅक करत केली ‘ही’ कमाल
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2: इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या मालिकेच्या चौथ्या टेस्ट सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) इशांत शर्माच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा (Umesh Yadav) समावेश केला आहे आणि त्याला 8 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. उमेश यादवनेही याचा पुरेपूर फायदा घेतला आणि पहिल्या डावात यजमानांच्या तीन मोठ्या फलंदाजांना बाद माघारी धाडलं. या सामन्यादरम्यान उमेश यादवने कसोटी क्रिकेटमध्येही मोठी कामगिरी केली. यादव कसोटी क्रिकेटमध्ये 150 विकेट घेणारा भारताचा सहावा वेगवान गोलंदाज बनला आहे, तसेच त्याने झहीर खानची (Zaheer Khan) बरोबरी केली आहे. यादवने सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला नाईट वॉचमन क्रेग ओव्हरटनची (Craig Overton) विकेट घेत 150 बळी मिळवले. त्यांनतर त्याने डेविड मालनला देखील पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यापूर्वी पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान त्याने जो रूटला बाद केले होते.

यादवने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या 49 व्या सामन्यात 150 विकेट्स पूर्ण केल्या, तर झहीर खाननेही देखील त्याच्या टेस्ट करिअरच्या 49 व्या सामन्यात हा मैलाचा दगड गाठला होता. अशाप्रकारे, उमेश कसोटीत 150 विकेट घेण्याच्या बाबतीत झहीर खानच्या बरोबरीवर आला आहे. कपिल देवने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 150 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. कपिल देवने हा पराक्रम फक्त 39 कसोटी सामन्यांमध्ये केला होता. तर जवागल श्रीनाथ 40 सामन्यांमध्ये 150 विकेट्स पूर्ण करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर शमीने 42 सामन्यांमध्ये असा आश्चर्यकारक कारनामा केला आहे. कपिल देव 434, इशांत शर्मा, झहीर खान, जवागल श्रीनाथ आणि मोहम्मद शमी  या पाच इतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी भारतासाठी 150 पेक्षा जास्त टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत.

2011 मध्ये पदार्पण करणाऱ्या यादवने शेवटचा सामना भारतासाठी डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला होता. त्यावेळी त्याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर पडावे लागले होते. भारत मात्र ती कसोटी जिंकण्यात यशस्वी झाला आणि उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 49 पैकी 28 कसोटी सामना भारतात खेळले आहेत. परदेशातील एकमेव देश जिथे त्याने लक्षणीय खेळ केला आहे तो ऑस्ट्रेलिया आहे, जिथे त्याने 10 कसोटी सामने खेळले असून 31 विकेट्स घेतल्या आहेत.