विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील चौथ्या अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. दिवसाखेर यजमान संघाने 1 विकेट गमावून 24 धावा केल्या असून इंग्लंड संघाच्या ते 181 धावांनी पिछाडीवर आहेत. जो रूटच्या (Joe Root) इंग्लिश संघाने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली, पण भारतीय फिरकीपटूंनी आपला दबदबा कायम ठेवला आणि पाहुण्या संघाला 205 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने (Ben Stokes) सर्वाधिक 55 धावा केल्या तर डॅन लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. दुसरीकडे, भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलच्या (Axar Patel) फिरकीचा जलवा यंदाही पाहायला मिळाला. अक्षरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर रविचंद्रन अश्विनने 3 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. मोहम्मद सिराजला 2 आणि वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली. दरम्यान, या चौथ्या निर्णयक सामन्याच्या पहिल्या दिवशी काही महत्वपूण रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 4th Test Day 1: इंग्लडचं लोटांगण; टीम इंडियाची निराशजनक सुरुवात, पहिल्या दिवसाखेर भारताची 181 धावांनी पिछाडी)

1. इंग्लिश कर्णधार जो रूट कर्णधार म्हणून आपल्या 50व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंडकडून पन्नास किंवा अधिक कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा रूट चौथा कर्णधार ठरला.

2. भारतीय कर्णधार विराट कोहलीने देशासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व कर्णधार कर्णधारांच्या एलिट यादीत एमएस धोनीची बरोबरी केली आहे. धोनीने कर्णधार म्हणून टीम इंडियाचे टेस्ट क्रिकेटमध्ये 60 सामन्यात नेतृत्व केले आहे तर कोहलीचा कर्णधार म्हणून हा 60वा सामना आहे.

3. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्याच्या संदर्भात माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये 8586 धावा केल्या आहेत तर रूटच्या नावावर आता 8587 धावा झाल्या आहेत.

4. भारताचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने वेस्ट इंडिजच्या रोहन कन्हाई (6227) आणि ऑस्ट्रेलियाच्या माइकल हसी (6235) यांना मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. पुजाराच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 6236 धावा झाल्या आहेत.

5. अक्षर पटेलने कसोटी क्रिकेट कारकीर्दीत 20 विकेट घेण्यासाठी 174 धावा दिल्या आहेत. यासह, सर्वात कमी धावांमध्ये 20 विकेट घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज बनला आहे. या एलिट यादीत ऑस्ट्रेलियाच्या रॉल मेस्सीचे नाव पहिले आहे. मेस्सीने 167 धावा देत 20 विकेट घेतल्या आहेत.

6. इंग्लंड संघाचा उपकर्णधार बेन स्टोक्सने आज 55 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. स्टोक्सच्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील हे 24वे अर्धशतक आहे.

7. विराट कोहली कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध 14 वा कसोटी सामना खेळत आहे. सुनील गावस्कर यांनी देखील कर्णधार म्हणून इंग्लिश संघाविरुद्ध 14 कसोटी सामने खेळले आहेत.

दोन्ही संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे तर टीम इंडिया सध्या 2-1ने आघाडीवर आहे. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला मात्र, पुढील 2 सामन्यात भारताने इंग्लंडवर मात करत जबरदस्त पुनरागमन केलं. आता यजमान संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चौथ्या सामान्य विजय किंवा ड्रॉची गरज आहे.