IND vs ENG 4th T20I 2021: ‘हिटॅमन’ रोहित शर्माचा भीम पराक्रम, सूर्यकुमार यादवने रचला इतिहास; पहा एका क्लिकवर
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th T20I 2021: अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) नुकत्याच संपुष्टात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध (England) भारतीय संघाने 8 धावांनी मोठा विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. बेन स्टोक्सने (Ben Stokes) सर्वाधिक 46 धावा केल्या तर जेसन रॉयने 40 धावा आणि जॉनी बेअरस्टोने 25 धावांचे योगदान दिले. पण, भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने इंग्लिश संघाचे विकेट घेत संघाच्या अडचणीत वाढ केलं. भारताकडून संघासाठी शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) तीन विकेट घेतल्या तर राहुल चाहर आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 2 विकेट, तर भुवनेश्वर कुमारला 1 विकेट मिळाली. यापूर्वी, टीम इंडियाकडून पहिले फलंदाजी करत सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 57 धावांची तुफान खेळी, तर श्रेयसने फटकेबाजी करत 37 धावांची खेळी केली. दुसरीकडे, इंग्लिश टीमसाठी जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सामन्यात काही महत्वपूर्ण रेकॉर्डही बनले जे खालिलप्रमाणे आहे. (IND vs ENG 4th T20I 2021: मोठ्या विजयासह भारताचे दणक्यात पुनरागमन, थरारक सामन्यात इंग्लंडचा 8 धावांनी दारुण पराभव; मालिका 2-2 अशा बरोबरीत)

1. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात केवळ 11 धावा पूर्ण करताच टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण करणारा जगातील 9वा खेळाडू आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरला.

2. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्ध षटकार खेचत फलंदाजीस सुरुवात केली. यासह सुर्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारासह डावाची सुरुवात करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

3. विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत दोनदा स्टंप आऊट करणारा इंग्लंड फिरकीपटू आदिल राशिद पहिला गोलंदाज ठरला आहे.

4. सूर्यकुमारने चौथ्या सामन्यात 31 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकार खेचत 57 धावांची खेळी केली आणि संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणात दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या. शिवाय, त्याने  ईशान किशानचा रेकॉर्ड देखील मोडला. ईशानने दुसऱ्या सामन्यात 56 धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणेने 2011 टी-20 पदार्पणात सर्वाधिक 67 धावा केल्या होत्या.

5. रोहित शर्मा टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 50 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याबरोबरच हा षटकार रोहितचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील भारतात मारलेला 50वा षटकार ठरला.

6. सूर्यकुमार यादव अवघ्या 28 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह अर्धशतक लगावलं आहे. सूर्याच्या टी-20 कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक ठरलं आहे.

7. भारताविरुद्ध चौथा टी-20 सामना इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोचा आंतरराष्ट्रीय करिअरमधील 50वा टी-20 सामना ठरला.

सूर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकूर टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. यादवने तुफान फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली तर शार्दूलने संघाला गरज असताना बेन स्टोक्स आणि अन्य महत्तवपूर्ण विकेट मिळवून दिल्या. राहुल चाहर, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने देखील ठाकूरला चांगली साथ दिली ज्यामुळे भारतीय संघाने इंग्लिश टीमवर वर्चस्व गाजवले. दरम्यान, दोन्ही संघात आता मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना 20 मार्च रोजी खेळला जाणार आहे.