भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th T20I 2021 Likely Playing XI: भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद 77 धावांवर इंग्लिश ओपनर जोस बटलरच्या नाबाद 83 धावांची अर्धशतकी खेळी भारी पडली आणि यजमान संघाला 8 विकेटने पराभव पत्करावा लागला. अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) नवीन सलामी जोडी यंदा सलामीला उतरली, मात्र दोघेही मोठी भागीदारी करू शकले नाही. शिवाय, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर देखील मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होऊन बाद झाले. दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकवीर ईशान किशन देखील आज फ्लॉप ठरला. तिसऱ्या सामन्यात विजयासह इंग्लडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि आता पुढील सामना याचा मैदानावर खेळणार असल्याने इंग्लंड संघाला टी-20 मालिका घालण्याची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे ‘करो या मरो’च्या सामन्यासाठी भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करते की नाही हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे. (IND vs ENG 3rd T20I 2021: Virat Kohli याचा ‘वन मॅन-शो’, KL Rahul लज्जास्पद विक्रमात अव्वल स्थानी; एका क्लिकवर पहा सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड)

इंग्लंडला विजय मिळवण्यापासून रोखण्यासाठी चौथ्या टी-20 भारतीय संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या सामन्यासाठी संघात अधिक बदल होताना दिसत नाही. संधी मिळूनही अपयशी ठरलेल्या राहुलला बाहेर करत सूर्यकुमार यादवचा समावेश करत ईशान किशन 'हिटमॅन'सह सलामीला उतरू शकतो. रोहित आणि ईशान मुंबई इंडियन्सकडूनही खेळत असल्याने दोघांमध्ये नक्कीच चांगले सामंजस्य असेल ज्याचा फायदा संघाला होऊ शकतो. शिवाय, कर्णधार विराट पुन्हा तिसऱ्या स्थानावर जबाबदारी सांभाळेल आणि संघ अडचणीत असताना मधल्या फळीतील फलंदाजांसह संघाची धावगती वाढवण्यात हातभार लावेल जे यापूर्वीच्या दोन सामन्यात पाहायला मिळाले आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या मधल्या फळीत धावगती वाढवण्यासाठी मैदानात उतरतील.

दुसरीकडे, यजमान संघाला गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करण्याची गरज आहे. दुखापतींनंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला काही खास प्रभाव पाडता आलेला नाही तर फिरकीपटू युजवेंद्र चहल देखील अपयशी ठरला. हार्दिक पांड्या देखील गोलंदाजीत फ्लॉप ठरला तर शार्दुल ठाकूरच्या पदरी देखील निराशाच आली. त्यामुळे, संघाच्या विजयात हातभार लावण्यासाठी गोलंदाजांना आपले स्तर उंचावण्याची गरज आहे.

पहा चौथ्या टी-20 साठी भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार.