इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test 2021: वेगवान गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने (England) लीड्सच्या हेडिंग्ले टेस्ट (Headingley Test) सामन्याचा निकाल चौथ्या दिवसात लावला. भारत (India) दुसऱ्या डावात 278 धावाच करू शकला परिणामी जो रूटच्या ब्रिटिश संघाने विराट कोहलीच्या भारतीय संघाला डाव आणि 76 धावांनी धूळ चारली आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ब्रिटिशांकडून ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर क्रेग ओव्हरने 3, जेम्स अँडरसन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली. लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या पराभवाला मागे टाकून इंग्लंड खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी केली आणि टीम इंडियावर बॅट व बॉलने वर्चस्व गाजवले. दुसरीकडे, भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांची अर्धशतकी खेळी देखील भारताला पराभवापासून वाचवू शकली नाही. पुजाराने सर्वाधिक 91 धावा ठोकल्या तर रोहितने 59 आणि विराटने 55 धावांचे योगदान दिले. (IND vs ENG Test: अष्टपैलू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला 'हा' अनोखा विक्रम)

चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 215 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाखेर नाबाद परतलेली विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या जोडीने पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, दोघे चौथ्या दिवशी फार काळ टिकू शकले नाही. रॉबिन्सनने पुजाराला पायचीत केले. यावेळी पंचांनी सुरुवातीला पुजाराला नाबाद ठरवले होते. मात्र, इंग्लंडने रिव्ह्यूची मागणी केली. त्यामध्ये पुजारा बाद असल्याचे दिसल्याने मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. पुजारा चौथ्या दिवशी एकही धावा न जोडता 91 धावांवर बाद झाला. पुजारानंतर विराटने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या कसोटी मालिकेतील पहिले अर्धशतक आहे. तर कारकिर्दीतील 26वे कसोटी अर्धशतक आहे. मात्र, अर्धशतक पूर्ण करताच तो 55 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ अँडरसनने रहाणेला 10 धावांवर झेलबाद करत माघारी पाठवले. त्यानंतर लगेच रॉबिन्सनने आणखी एक धक्का दिला आणि रिषभ पंतला 1 धावेवर माघारी धाडले. मोईन अलीने मोहम्मद शमीला 6 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. रॉबिन्सनने इशांतला 2 धावांवर बाद करून सामन्यात वैयक्तिक पाचवी विकेट आपल्या नावे केली.

यापूर्वी भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. आणि टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना भारतावर 354 धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.