IND vs ENG 3rd Test Day 3: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) संघात लीड्सच्या हेडिंग्ले (Headingley) स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ 4 षटकं अगोदर थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला. ब्रिटिश संघाचा पहिला डाव 432 धावांवर गुंडाळत टीम इंडियाने (Team India) दिवसाचा खेळ संपला तेव्हा व 2 विकेट्स गमावून 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. तथापि भारतीय संघ (Indian Team) इंग्लंडच्या 139 धावांनी पिछाडीवर आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी फलंदाजीची धुरा हाती घेत अखेरच्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांच्या धुलाई केली. पुजारा 91 धावा तर कोहली 45 धावा करून नाबाद परतला. यापूर्वी भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्माने (Rohit Sharma) तिसऱ्या दिवशी 59 धावा ठोकल्या तर लीड्स येथे पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील केएल राहुल अपयशी ठरला. पहिल्या डावात भोपळा फोडू न शकणारा राहुल दुसऱ्या डावात 8 धावाच करू शकला. दुसरीकडे, इंग्लंडकडून क्रेग ओव्हरटन आणि ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs ENG 3rd Test Day 3: वाह रे वाह! Cheteshwar Pujara ने ‘हिटमॅन’ स्टाईल शॉट खेळत ठोकले कारकिर्दीतील 30 वे अर्धशतक)
तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 8 बाद 423 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. ओव्हरटन आणि रॉबिन्सनच्या जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र, दोघेही फार काळ टिकू शकले नाही आणि यजमान संघाचा डाव 432 धावांवर आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून राहुल आणि रोहितची जोडी सलामीला उतरली. दोघांनीही सावध खेळ करताना इंग्लंडला लवकर यश मिळू दिले नाही. पण राहुल 19व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर ओव्हरटच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोकडे झेल देऊन बाद झाला. दुसऱ्या डावात राहुल लवकर बाद झाल्यानंतर रोहित आणि पुजाराने संयमी फलंदाजी करत संघाचा मोर्चा सांभाळला. दोंघानी दुसरे सत्र पूर्ण खेळून काढले आणि संघाची स्थिती आणखी भक्कम केली. त्यानंतर दिवसाच्या अंतिम सत्रात दोंघांमध्ये 82 धावांची भागीदारी झाली असताना रॉबिन्सनने रोहितला पायचित करत भारताला दुसरा झटका दिला. रोहित बाद झाल्यावर पुजाराने विराटला साथीला घेत फटकेबाज सुरूच ठेवली आणि अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दोघांनी अंतिम सत्रात इंग्लिश गोलंदाजांना विकेट्ससाठी संघर्ष करायला लावला.
दरम्यान, इंग्लंडकडून या डावात कर्णधार जो रुटने 121 धावांची शतकी खेळी केली. तर बर्न्स आणि हमीद या सलामीवीरांनी अर्धशतके झळकावत 135 धावांची सलामी दिली. बर्न्सने 61 आणि हमीने 68 धावांची खेळी केली. तसेच तिसऱ्या दिवशी ओव्हरटनने 32 धावांची खेळी केली ज्यामुळे इंग्लंडने 400 धावांचा टप्पा ओलांडला.