IND vs ENG 3rd Test Day 3: वाह रे वाह! Cheteshwar Pujara ने ‘हिटमॅन’ स्टाईल शॉट खेळत ठोकले कारकिर्दीतील 30 वे अर्धशतक (Watch Video)
चेतेश्वर पुजाराचा पूल-शॉट (Photo Credit: Twitter)

ENG vs IND 3rd Test Day 3: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स (Leeds) येथे खेळला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव 132.2 षटकात 432 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडे आता 354 धावांची मजबूत आघाडी असून टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी अर्धशतकी धावसंख्येचा पल्ला गाठला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताचा कसोटी तज्ञ पुजाराने 91 चेंडू 30 वे टेस्ट अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे यासाठी पुजाराने ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पूल-शॉटची पुनरावृत्ती केली. गेल्या अनेक काळापासून पुजाराच्या फॉर्मबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र लीड्सच्या दुसऱ्या डावात आपल्या आक्रमक खेळीने पुजाराने पुन्हा एकदा आपली योग्यताच सिद्ध केली नाही तर टीकाकारांचे तोंड देखील बंद केले. (IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडच्या माजी कर्णधाराने हेडिंग्ले टेस्ट सामन्यात Virat Kohli याच्या कॅप्टन्सीवर उपस्थित केले प्रश्न, टीम इंडियाला सुनावले खडे बोल)

पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाची दमछाक उडाली आणि त्यांचा पहिला डाव फक्त 78 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने कर्णधार जो रूटचे शतक, रोरी बर्न्स, हसीब हमीद आणि डेविड मलान यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 400 पार धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरात भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. क्रेग ओव्हर्टनने सलामीवीर केएल राहुलला वैयक्तिक आठ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर रोहित आणि पुजाराने किल्ला लढवायला सुरुवात केली व संघाला शंभरी धावसंख्या गाठून दिली. चहापानानंतर ओली रॉबिन्सनने रोहितला तंबूचा मार्ग दाखवला. यानंतर अखेरीस मोठ्या प्रतीक्षेनंतर पुजारा फॉर्ममध्ये परतला आणि अर्धशतक झळकावत सामन्यात भारताच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. पुजाराने ओव्हरटनच्या गोलंदाजीवर ‘हिटमॅन’ रोहितचा ट्रेडमार्क अप्रतिम पूल-शॉट खेळत पन्नाशी धावसंख्या पूर्ण केली.

दुसरीकडे, दुसऱ्या डावादरम्यान पुजारा एका वेगळ्या शैलीत दिसला आणि वेगाने धावा करताना दिसला. पुजाराने क्रीजवर उतरताच आक्रमक पवित्रा घेत खराब चेंडू सीमारेषे पार पोहचवण्यास सुरुवात केली. पुजारा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची जोरदार धुलाई करत आहे. पुजाराची आक्रमक शैली पाहून विरोधी संघाचे खेळाडू, गोलंदाज आणि कर्णधार जो रूटही थक्क दिसत आहेत.