IND vs ENG 3rd D/N Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झालेल्या तिसऱ्या पिंक-बॉल टेस्टच्या (Pink Ball Test) पहिल्या दिवसाखेर यजमान टीम इंडियाने 3 विकेट गमावून 99 धावा केल्या आहेत. यापूर्वी, भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 112 धावांवर गुंडाळलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) 57 धावा आणि अजिंक्य रहाणे 1 धावा करून खेळत होते. इंग्लंडकडून जॅक लीच आणि जोफ्रा आर्चर यांनी टीम इंडियाला दिवसाच्या अखेरच्या सत्रात लागोपाठ धक्के दिले. लीचला 2 आणि आर्चरला दिवसाखेर 1 विकेट मिळाली. सामन्याच्या पहिल्या दिवसावर लोकल बॉय अक्षर पटेलने वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्यातून पदार्पण करणाऱ्या अक्षरने सलग दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक धावा केल्या. क्रॉलीने 84 चेंडूत 10 चौकारांसह 53 धावा केल्या तर इंग्लिश ओपनरव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. (IND vs ENG 3rd D/N Test: बेन स्टोक्सच्या कॅचवर झाला विवाद; अंपायरच्या निर्णयावर जो रुट, विराट कोहली यांच्या परस्पर विरोधी प्रतिक्रिया, पहा Videopo)
यजमान भारतीय संघासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या सलामी जोडीने सावध सुरुवात केली. दोन्ही मैदानात सेट झाले असताना इंग्लंड गोलंदाजांना विकेट्ससाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र, आर्चरच्या गोलंदाजीवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्न शुबमन गिल 11 धावा करुन माघारी परतला. शुभमननंतर आलेला टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा भोपळा न फोडता बाद झाला. पुजाराला लीचने शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं ज्यामुळे टीम इंडियाने 34 धावांवर दुसरी विकेट गमावली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या चेंडूवर 24 धावांवर जीवनदान मिळालं मात्र, त्याला अधिक काळ याचा फायदा झाला नाही आणि लीचने त्याची दांडी उडवली. विराटने 58 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा केल्या.
दुसरीकडे, दिवसाच्या सुरुवातीला टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लिश टीमची अक्षर आणि अश्विनच्या जोडीने कंबर मोडली. संघ नियमित अंतराने विकेट गमावत असताना झॅक क्रॉलीने आपली बाजू धरून ठेवली आणि कसोटी कारकिर्दीतील चौथं अर्धशतक ठोकलं. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने फलंदाजांची साथ मिळाली नाही. संघाने झटपट दोन विकेट गमावल्यावर त्याने कर्णधार रूटसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, अश्विनने रुटला 17 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आणि इंग्लिश टीमला मोठा झटका दिला. क्रॉली आणि रूटमध्ये 47 धावांची भागीदारी झाली. यानंतर, एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि पाहुण्या संघाचा पहिला डाव स्वस्तात आटोपला.