रविचंद्रन अश्विन आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd ODI 2021: पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) जोडीने दणदणीत सुरुवात करून दिली. आजच्या तिसऱ्या सामन्यात नाणेफेकचा कौल इंग्लंड कर्णधार जोस बटलरच्या बाजूने गेला ज्याने विराट कोहली आणि कंपनीला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डावाची सलामी देत रोहित-धवनने विरोधी गोलंदाजांवर हल्ला चढवला व पहिल्या 10 ओव्हरमध्ये 65 धावा काढल्या. अनुभवी ओपनरला लयीत पाहून शर्मा चौथे दुहेरी शतक करेल आणि भारत 400+ धावांची विशाल धावसंख्या करेल असा रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) अंदाज वर्तवला. “आतापर्यंत आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये 400 धावांचा यशस्वीपणे पाठलाग फक्त एकदाच करता आला आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने आतार्यंत वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावले आहे,” भारतीय फिरकी गोलंदाजाने ट्विटरवर लिहिले. (IND vs ENG 3rd ODI 2021: शिखर धवन-रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक, इंग्लंडला विजयासाठी 330 धावांचे आव्हान)

तथापि, अश्विनचा अंदाज चूकला आणि रोहित, फिरकीपटूच्या ट्विटनंतर, इंग्लिश स्पिनर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर 37 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. आपल्या संघाला पहिले यश मिळवून देण्यासाठी व मुंबईकर फलंदाजाला बाद करण्यासाठी रशीदने अप्रतिम गुगली फेकली. मात्र, आदिलकडून रोहितने विकेट गमावल्याबरोबरच अश्विनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हटवले दुसर्‍या एका ट्विटमध्ये त्याने भारतीय संघाच्या चांगल्या सुरुवातीला नजर लावली असल्याचे म्हटले. “मी मागील ट्विट हटवले! #jinxedagoodstart #INDvsENG” अश्विनने ट्विट केले. रोहितनंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीदेखील एकापाठोपाठ बाद झाले ज्यामुळे इंग्लिश संघाला आघाडी मिळाली.

दरम्यान, आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने भारतीय डाव पुन्हा रुळावर आणला. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अर्धशतके झळकावली. शानदार 78 धावा काढून पंत बाद झाला. पंत वगळता धवनने 67 आणि हार्दिकने 64 धावांचे योगदान दिले व टीम इंडियाने 48.2 ओव्हरमध्ये  329 धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंड टीमकडून मार्क वूड यशस्वी गोलंदाज ठरला. वूडने 3 तर आदिल रशीदने 2 गडी बाद केले.