IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर टीम इंडियाची 7 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, थरारक लढतीत इंग्लंडवर 151 धावांनी विजयावर केला शिक्कामोर्तब
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पाचव्या दिवशी रंगतदार सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने (Indian Team) 151 धावांनी विजय मिळवला आणि सात वर्षाने विजयाची पुनरावृत्ती केली. भारताने दिलेल्या 272 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड 120 धावांवर ढेर झाला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत ‘विराटसेने’ने 0-1 अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वात 2014 इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) टीम इंडियाने (Team India) या ऐतिहासिक मैदानावर विजय मिळवला होता. आणि आता विराटच्या नेतृत्वात भारताने या इतिहासाची पुनरावृत्ती करत थरारक विजयाची नोंद केली आहे. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात रूटने 33 धावा काढल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने 4 विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराहला 3 आणि इशांत शर्माला 2 विकेट्स मिळाल्या. तसेच मोहम्मद शमीने 1 विकेट काढली. (IND vs ENG 2nd Test: टीम इंडियाने ‘लॉर्ड्स’ केले काबीज आणि Virat Kohli बनला विंडीज दिग्गज Clive Lloyd यांच्यापेक्षा बनला सर्वोत्तम टेस्ट कर्णधार)

लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात भारताने सलामीवीर केएल राहुलच्या शतकी धावांच्या जोरावर 364 धावांचा डोंगर उभारला. पण इंग्लिश कर्णधार जो रूटने संयमाने भारतीय गोलंदाजांचा सामना करत 180 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला 391 धावांपर्यंत मजल मारून देत 27 धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेले भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबुत परतले. अशास्थितीत अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांनी सूत्रे हाती घेत शतकी भागीदारी केली आणि संघाचा मोर्चा सांभाळला. यादरम्यान रहाणेने लयीत परतत 23 वे कसोटी अर्धशतक ठोकले. रहाणे-पुजाराच्या जोडीने इंग्लंडला विकेट्ससाठी संघर्ष करायला लावला. चौथ्या दिवसाखेर धडाखेबाज खेळाडू माघारी परतल्यावर पाचव्या दिवशी रिषभ पंतवर संघाला मजबूत स्थितीत नेण्याची जबाबदारी होती पण सुरुवातीला तो देखील अपयशी ठरला.

दिवसाच्या सुरुवातीला पंत 22 धावा करून माघारी परतला. त्याच्यापाठोपाठ काही अंतराने ईशांत शर्माही पॅव्हिलियनमध्ये परतला. मात्र बुमराह आणि शमीने अप्रतिम फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढला. दुसऱ्या सत्रात भारताने 298/8 धावांवर डाव घोषित केला आणि यजमानांना 272 धावांचे टार्गेट दिले. तथापि दिवसाच्या उर्वरित दोन सत्रात मोठ्या लक्ष्याचा दबाव इंग्लंड संघ हाताळू शकला नाही आणि भारताच्या भेदक माऱ्यापुढे ढेर झाले. जोस बटलरने चिवट फलंदाजी करत सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला व निर्णायक क्षणी सिराजच्या चेंडूवर पंतकडे झेलबाद होऊन माघारी परतला. बटलरने 96 चेंडूत 25 धावा केल्या. यामुळे सामना ड्रॉ करण्याच्या इंग्लंडच्या आशा संपुष्टात आल्या.