IND vs ENG 2nd Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्यात यजमान भारतीय संघाचा (Indian Team) डाव 286 धावांवर संपुष्टात आला आहे. यासह इंग्लंडला दुसऱ्या सामन्यात विजयासाठी 482 धावांचं तगडं आव्हान मिळालं आहे. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 62 धावा केल्या तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सर्वाधिक 106 धावा केल्या. दिवसाच्या सुरुवातीला आघाडीचे 5 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर विराट-अश्विनने 96 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला आणि दुसऱ्या डावात मोठी आघाडी मिळवून दिली. या दोघांव्यतिरिक्त रोहित शर्माने 26 आणि शुभमन गिलने 14 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंड गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, पण यजमान संघाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखू शकले नाही. जॅक लीच (Jack Leech) आणि मोईन अली (Moeen Ali) या दोन फिरकीपटूंना प्रत्येकी 4 विकेट मिळाल्या तर ओली स्टोनला 1 विकेट मिळाली. अन्य गोलंदाज एकही गडी बाद करू शकले नाही. (IND vs ENG 2nd Test Day 3: Chepauk वर Ashwin वादळ, चौकारासह पूर्ण केले शानदार 5वे कसोटी शतक)
भारताच्या पहिल्या डावातील 329 धावांच्या प्रत्युतरात इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर आटोपला. यामुळे भारताला 195 धावांची मोठी आघाडी मिळाली होती. अश्विनने पहिल्या डावात 23.5 ओव्हर गोलंदाजी करत 43 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यानंतर, संघ कठीण स्थितीत असताना अश्विनने बॅटने देखील कमाल केली. संघासाठी तिसऱ्या दिवसाची सुरुवात काही चांगली झाली नाही आणि 1 बाद 54 धावांपासून खेळणाऱ्या टीम इंडियानेपहिल्या सत्रातच चेतेश्वर पुजारा आणि रोहितपाठोपाठ रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची देखील विकेट गमावली. अक्षर पटेल देखील कर्णधार कोहलीला अधिक काळ साथ देऊ शकला नाही. मात्र, विराट आणि अश्विनने इंग्लंड गोलंदाजांचा चांगला समाचार घेत पाहुण्या संघावर दबाव बनवला व शानदार खेळी केली. कोहलीने झुंजार अर्धशतक करत संघाचा डाव सावरला. विराटपाठोपाठ अश्विनने शानदार अर्धशतक पूर्ण केलं. विराट बाद झाल्यावरही अश्विन आक्रमक फलंदाजी करत राहिला आणि 134 चेंडूत शतक पूर्ण केले. मात्र, शतक साजरं केल्यानंतर अश्विन फार वेळ मैदानात टीकू शकला नाही आणि 106 धावांवर स्टोनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.
यापूर्वी, पहिल्या डावात रोहित शर्माच्या 161 धावा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर टीम इंडियाने 329 धावांपर्यंत मजल मारली. त्यायनंतर, इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर आटोपल ज्यामुळे भारताला 195 धावांची मोठी आघाडी मिळाली.