IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंड विरोधात KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक, लॉर्ड्सवर शतक झळकावणारा बनला दहावा भारतीय फलंदाज; ‘हे’ होते पहिले
केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) लंडनच्या लॉर्ड्स (Lords) मैदानावर सूर्य असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) खणखणीत शतक ठोकले आहे. रोहित शर्मा सोबत शतकीय भागीदारीनंतर राहुलने तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत अर्धशतकी भागीदारी करत लॉर्ड्स टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी शंभरी धावसंख्या गाठली. राहुलने इंग्लंडविरुद्ध कसोटीत 212 चेंडूत आपले दुसरे शतक झळकावले. राहुलचे कसोटी क्रिकेटमधील हे सहावे शतक असून लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. उल्लेखनीय म्हणजे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 सायकलमध्ये शतक ठोकणारा राहुल पहिला शतकवीर बनला आहे. (IND vs ENG 2nd Test: इंग्लंडमध्ये रोहित शर्मा-केएल राहुल सुपरहिट, लॉर्ड्सवर 69 वर्ष जुना विक्रम मोडीत काढत केला जबरदस्त कारनामा)

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर शतक ठोकणे प्रतिष्ठेचे मानले जाते. विनू मंकड (Vinoo Mankad) हे या मैदानावर शतक ठोकणारे पहिले भारतीय होते. मंकड यांच्यानंतर दिलीप वेंगसरकर यांनी या मैदानावर तीन शतके ठोकण्याची अफलातून कामगिरी केली आहे. याशिवाय गुंडाप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अजहरुद्दिन, सौरव गांगुली, अजित आगरकर व राहुल द्रविड यांनी या मैदानावर शतक साजरे केले आहे. तसेच राहुलपूर्वी 2014 मध्ये या मैदानावर अजिंक्य रहाणेने अखेरीस भारतीय म्हणून शतक ठोकले होते. दरम्यान 2021 इंग्लंड दौऱ्यावर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात राहुल पुन्हा एकदा रोहित शर्मासोबत सलामीला उतरला. पावसाने बाधित सामन्यात दोंघांनी सावध सुरुवात केली पण लय पकडताच आक्रमक पवित्रा घेत टीम इंडियाच्या या सलामी जोडीने इंग्लंड गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

दुसरीकडे, आजपासून सुरु झालेल्या सामन्यात राहुलपूर्वी त्याचा सलामी साथीदार रोहित शर्मा देखील शतकाकडे वाटचाल करत होता पण मोक्याच्या क्षणी अनुभवी ब्रिटिश गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याला त्रिफळा उडवला 83 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. यासह परदेशात ते देखील लॉर्ड्सच्या मैदानावर शतक ठोकण्याचे रोहितचे स्वप्न भंग झाले. लक्षात घेण्यासारखे की, ट्रेंट ब्रिजवरील अंतिम दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला.