IND vs ENG 2021: सराव सामना अनिर्णीत राहूनही टीम इंडियाला झाला ‘असा’ फायदा, पाहा कोणत्या खेळाडूंनी केली कमाल
भारत विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG Test Series 2021: काउंटी सेलेक्ट इलेव्हन (County Select XI) विरुद्ध भारताचा (India) तीन दिवसीय सामना अनिर्णीत संपुष्टात आला. या सामन्याने टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ केली आहे कारण वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान (Avesh Khan) बोटाच्या दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे सराव सामन्यात त्यांच्या प्रीमियर खेळाडूंचा फॉर्म. भारतीय संघासाठी (Indian Team) एक सकारात्मक बाब म्हणजे यजमान इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी या सराव सामन्यात सराव सामन्यात मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), रवींद्र जडेजा, केएल राहुल (KL Rahul), मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि उमेश यादव यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मुख्य सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या डावात धावा करण्यात अपयशी ठरला असला तरी अन्य खेळाडूंनी मात्र सकारात्मक फॉर्म दर्शवला. (India vs County XI Tour Match: सराव सामन्यादरम्यान केएल राहुलच्या देशभक्तीच्या ‘या’ कृतीने जिंकले नेटकऱ्यांची मने)

रोहित शर्मासोबत सलामीसाठी मयंक अग्रवालला प्रबळ दावेदार मानले जात आहे. शिवाय, त्याने दोन्ही डावात दावेदारी मजबूत देखील केली. मयंकने पहिल्या डावात 28 तर दुसऱ्यांदा फलंदाजी करत 47 धावा काढल्या. दुसऱ्या डावात अग्रवालने कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजाराच्या साथीने 87 धावांची भागीदारी केली. तसेच केएल राहुलने पहिल्या डावात फलंदाजी करत 101 धावांची शतकी खेळी करत संघाच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाया भक्कम केला होता. इंग्लंडविरुद्ध राहुल मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसेल. यांच्याशिवाय धडाकेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजाने दोन्ही डावात अर्धशतकी धावांचे योगदान दिले. जडेजाने अनुक्रमे 75 व नाबाद 51 धावांची कामगिरी बजावली. दुसरीकडे, गोलंदाजही प्रभाव पाडण्यात मागे राहिले नाही. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 13 ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले होते तर तसेच वेगवान गोलंदाज उमेश यादवने देखील 25 ओव्हरमध्ये 22 धावा खर्च करत 3 विकेट्स काढल्या. याशिवाय, WTC फायनल सामन्यात अपयशी ठरलेल्या जसप्रीत बुमराहला 1 विकेट मिळाली.

दुसरीकडे, इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडलेल्या गिल आणि आवेश खान यांच्या जागी बदली खेळाडूंची अद्याप घोषणा करण्यात आली नाही आहे. शुभमन मायदेशी पोहचला आहे तर खानच्या दुखापतीची गंभीरता अद्याप समजलेली नाही. तसेच वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्याची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही आहे.