IND vs ENG 2021: पृथ्वी शॉ याच्या इंग्लंड वारीवर BCCI अधिकाऱ्याने दिले स्पष्टीकरण, केएल राहुलला मिळू शकते मोठी जबाबदारी
पृथ्वी शॉ (Photo Credit: IANS)

IND vs ENG Series 2021: भारतीय संघ (Indian Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) असून 4 ऑगस्टपासून दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण त्यापूर्वी शुभमन गिलला (Shubman Gill) दुखापत झाल्यामुळे त्याला सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे. अशास्थितीत आता रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या टीमकडे केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल पर्याय म्हणून उपलब्ध आहेत पण संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची विनंती केली असल्याचे वृत्ती समोर आले होते ज्यावर आता एका बीसीसीआय  (BCCI) अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बोर्ड आणि निवड समितीने पृथ्वी शॉ किंवा देवदत्त पडिक्क्लला जखमी गिलच्या जागी इंग्लंडला पाठवण्यास नकार दिला आहे जोपर्यंत श्रीलंका दौरा पूर्ण होत नाही. (IND vs ENG Series 2021: इंग्लंड-भारत कसोटी मालिकेची रंगत वाढणार, स्टेडियममध्ये होणार प्रेक्षक प्रवेश)

बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “पृथ्वी श्रीलंकेत राहून 26 जुलैपर्यंत सहा सामन्यांची मालिका पूर्ण करेल. त्यांची निवड झाली आहे आणि त्याने या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत. श्रीलंका मालिका संपल्यानंतर शक्यता पहिली जाईल पण आतापर्यंत काहीच होऊ शकत नाही.” पृथ्वीने अ‍ॅडिलेड येथे अखेरचा कसोटी सामना खेळला होता. मयंक आणि राहुल वगळता राखीव सलामी फलंदाज म्हणून अभिमन्यू ईस्वरन देखील इंग्लंडमध्ये उपस्थित आहे. टीम मॅनेजमेंटला दोन सलामी फलंदाजांची गरज होती कारण अभिमन्यू ईस्वरनचे बॅटींग तंत्र आत्मविश्वास वाढवत नाही. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने संघात काही बदल करण्याचे संकेत दिले होते. यानुसार कसोटी सलामी फलंदाज राहुल आता मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसेल. अशापरिस्थितीत जर पृथ्वी किंवा पडिक्क्लला इंग्लंड दौऱ्यावर पाठवले गेले नाही तर संघाकडे शुभमनच्या जागी फक्त अग्रवाल एक पर्याय उपलब्ध आहे.

इंग्लड दौऱ्यावरील भारतीय संघ सध्या 20 दिवसाच्या ब्रेकवर असून 14 जुलै रोजी लंडनच्या बायो-बबलमध्ये दाखल होती. दुसरीकडे, शिखर धवनच्या नेतृत्वातील टीम इंडिया 13 जुलैपासून श्रीलंकाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे व टी-20 मालिका खेळणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची मानली जात आहे.