IND vs ENG 1st Test Day 1: जसप्रीत बुमराहचे भारतात टेस्ट डेब्यू, इंग्लंड फलंदाजाला माघारी पाठवत देशात घेतली पहिली कसोटी विकेट, पहा Video
जसप्रीत बुमराह (Photo Credit: BCCI/Twitter)

IND vs ENG 1st Test Day 1: अल्पावधीतच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जागतिक क्रिकेटमधील अव्वल वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला. भारताच्या (Indian Team) वेगवान गोलंदाजीचा प्रमुख म्हणून कायम असलेल्या बुमराहने गेल्या काही वर्षांत परदेशात संघाच्या कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जागतिक दर्जाचा गोलंदाज असूनही, बुमराहला घरच्या मैदानावर टेस्ट सामना खेळण्यासाठी तब्बल तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागली. जो रुटच्या इंग्लंड (England) संघाविरुद्ध चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामना बुमराहचा घरच्या मैदानावरील पहिला कसोटी सामना ठरला. इंग्लंडचा डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) भारतात बुमराहचा कसोटी क्रिकेटमधील पहिला शिकार ठरला. इंग्लंडच्या चांगल्या सुरुवातीनंतर रविचंद्रन अश्विन आणि बुमराहने संघाला झटके दिले. (IND vs ENG 1st Test Day 1: टीम इंडिया गोलंदाजांचा डबल दणका, लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोर 67/2)

दुपारच्या जेवणाच्या काही वेळेपूर्वी बुमराहने लॉरेन्सला एलबीडब्ल्यू बाद करत माघारी पाठवलं. लॉरेन्सला भोपळाही फोडता आला नाही आणि इंग्लंडची 63-2 अशी स्थिती झाली. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहने परदेशात 17 सामने खेळले ज्यात त्याने 79 विकेट्स घेतल्या आहेत आणि लॉरेन्स बुमराहचा भारतात टेस्ट सामन्यातील पहिलाच बळी ठरला. दरम्यान, सामन्यात आपली पहिलीच ओव्हर टाकत बुमराहची भारतामधील पहिली टेस्ट ही आणखी संस्मरणीय ठरली असती पण, विकेटकिपर रिषभ पंतने ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कॅच सोडला. बुमराहने टाकलेला चेंडू रोरी बर्न्सच्या बॅटच्या कडेला लागून पंतच्या दिशेनं गेला, पण पंतला तो अवघड कॅच पकडता आला नाही ज्यामुळे बुमराहचे भारतात ड्रीम डेब्यूचे स्वप्न भंगले.  पहा बुमराहची ही कमाल गोलंदाजी:

यापूर्वी इंग्लंड कर्णधार जो रुटने टॉस जिंकून पहिले बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. रोरी बर्न्स आणि डॉम सिब्लीच्या जोडीनं संयमी सुरुवात करून दिली. दोंघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी झाली त्यानंतर भारतीय गोलंड्नाजांनी जबरदस्त कमबॅक करत इंग्लंड लंचपर्यंत दोन झटके दिले.