IND vs ENG 1st Test: पहिल्या इंग्लंड टेस्टपूर्वी BCCI ने शेअर केला ट्रेंट ब्रिज खेळपट्टीचा फोटो, टीम इंडियाची वाढू शकते टेन्शन (See Photo)
विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 1st Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून नॉटिंगहॅमच्या (Nottingham) ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी एक फोटो समोर आले आहे, ज्यामुळे टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढू शकते. बीसीसीआयने (BCCI) नॉटिंगहॅमच्या खेळपट्टीचा (Nottingham Pitch) फोटो शेअर केले आहे, ज्यामुळे टीम इंडिया अस्वस्थ होऊ शकते. खेळपट्टीवर भरपूर गवत दिसत आहे आणि जर या खेळपट्टीवर पहिली कसोटी खेळली गेली तर विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. इंग्लंडमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते. तिथे सीम आणि स्विंग गोलंदाजांना खूप मदत मिळते. (IND vs ENG 2021 Series: कसोटी मालिकेत इंग्लंड विरोधात कोण ठरणार ट्रम्प कार्ड, दक्षिण आफ्रिकन स्टार क्रिकेटरने ‘या’ भारतीय गोलंदाजावर लावला दाव)

अशा परिस्थितीत जर खेळपट्टीवर गवत असेल तर वेगवान गोलंदाज अधिक धोकादायक सिद्ध होऊ शकतात. या खेळपट्टीवर पहिल्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजांना मदत मिळू शकते. तर तिसऱ्या आणि चौथ्या डावात गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते. दरम्यान, टीम इंडियाने नॉटिंगहॅम गाठले आहे आणि तिथे  प्रशिक्षण सुरू केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक मिळाला होता. यानंतर, टीम इंडियाने 20 ते 22 जुलै दरम्यान काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळला, जो अनिर्णित राहिला होता. सराव सामन्यात केएल राहुलने पहिल्या डावात 101 आणि रवींद्र जडेजाने भारतासाठी 75 धावा केल्या. तसेच उमेश यादव तीन विकेट घेण्यात यशस्वी झाला होता. दरम्यान, नॉटिंघम खेळपट्टीबाबतर बोलायचे तर इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड भारतासाठी घातक ठरू शकतात.

ट्रेंट ब्रिज येथील रेकॉर्ड देखील त्याच दिशेने निर्देशित करत आहे. अँडरसनने या मैदानावर 19.62 च्या सरासरीने 10 कसोटीत सर्वाधिक 64 विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय, त्याचा वेगवान जोडीदार ब्रॉड ट्रेंट ब्रिजवर सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने 6 कसोटी सामन्यात 20.21 च्या सरासरीने 41 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाकडून ईशांत शर्माने या मैदानावर 3 कसोटी सामन्यात 12 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याला एकदाही पाच विकेट्स घेता आल्या नाहीत.