जसप्रीत बुमराह (Photo Credits: Getty Images)

इंग्लंड (England) संघाविरुद्ध चेन्नई (Chennai) येथेही पहिल्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ (Indian Team) कंबर कसून तयार आहे. 5 फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे तर टीम इंडियाचा (Team India) आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) हा सामना खूप खास ठरणार आहे. बुमराह हा भारताचा नंबर एक वेगवान गोलंदाज आहे. मात्र, जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या बुमराहने आतापर्यंत भारतात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. बुमराहने आजवर 17 कसोटी सामने खेळली आहेत मात्र हे सर्व त्याने परदेशात खेळले आहे. अशास्थितीत, इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात संधी मिळाल्यास बुमराह भारतात कसोटी डेब्यू करू शकतो. बुमराहने जो रूटच्या इंग्लंड संघाविरुद्ध 3 टेस्ट सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. (IND vs ENG 1st Test 2021: युवा मोहम्मद सिराज की अनुभवी इशांत शर्मा? इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वेगवान गोलंदाज निवडीचा भारतीय संघ व्यवस्थापनापुढे पेच)

भारतात पहिली कसोटी खेळण्यापूर्वी बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये 32 विकेट्स, न्यूझीलंडमध्ये 6, दक्षिण आफ्रिकेमध्ये 14 आणि वेस्ट इंडिजमध्ये 13 विकेट्स घेत आपली दहशत निर्माण केली आहे. सहसा जेव्हा गोलंदाज आपल्या कारकीर्दीची सुरूवात करतो तेव्हा घरेलू मैदानात विकेट घेतो, पण घरी खेळण्यापूर्वीच बुमराहने विदेशी मैदानावर बाजी मारली आहे. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत टेस्ट डेब्यू करणाऱ्या बुमराहने भारतात एकाही कसोटी खेळलेला नसला तरी, त्याने 5 देशांत एकूण 17 कसोटी सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच आता तो त्याच्या 100 व्या कसोटी विकेटपासून अवघे काही विकेट दूर आहे. बुमराहचे भारतात डेब्यू इंग्लंड कर्णधार जो रूटच्या 100व्या कसोटी सामन्यातून होणार आहे. रूटने आपल्या कारकिर्दीतील 99 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 50 च्या सरासरीने 8249 धावा केल्या आहेत.

दरम्यान, आगामी कसोटी मालिकेत बुमराहने 100 कसोटी विकेटचा टप्पा गाठल्यास तो 100 विकेट घेणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज ठरेल. त्यामुळे, मायदेशात पहिल्यांदा कसोटी मालिका खेळणारा बुमराह भारतात टेस्ट करिअरमधील मैलाचा दगड गाठण्यासाठी नक्कीच सर्वतोपरीने प्रयत्नशील असेल.