टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st T20I 2021: भारतीय संघाविरुद्ध (Indian Team) झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इयन मॉर्गनच्या इंग्लंड (England) संघाने अष्टपैलू कामगिरी करत 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली इंग्लंडकडून जेसन रॉय (Jason Roy) आणि जोस बटलरच्या (Jos Buttler) जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. रॉयने सर्वाधिक 49 धावा केल्या तर बटलरने 28 धावा केल्या. अखेरीस जॉनी बेअरस्टो 26 आणि डेविड मलान 24 धावा करून नाबाद परतले. भारतासाठी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.  टॉस गमवून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघासाठी श्रेयसने 48 चेंडूत 67 धावांची मोठी खेळी केली तर रिषभ पंत 21 धावा आणि हार्दिक पांड्याने 19 धावा करत श्रेयसला चांगली साथ दिली. दरम्यान, मालिकेच्या सलामीच्या सामन्यात काही प्रमुख रेकॉर्डही बनले जे खालीलप्रमाणे आहे. (IND vs ENG 1st T20I 2021: इंग्लंडची मालिकेत विजयी सलामी, पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने उडवला धुव्वा)

1. भारतीय कर्णधार विराट कोहलीला बेन स्टोक्सने शून्यावर बाद केलं ज्यामुळे त्याच्या नावावर एका नकोश्या विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे. कसोटी मालिकेमधील शेवटच्या सामन्यामध्ये विराट आठ चेंडू खेळून भोपळाही न फोडता बाद झाला होता.

2. संघ अडचणीत असताना श्रेयस अय्यरने झुंजार अर्धशतक केले आणि संघाचा डाव सावरला. श्रेयसच्या टी-20 कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक ठरले.

3. फिरकीपटू युजवेंद्र चहल भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडचा जोस बटलर चहलचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 60 वा शिकार ठरला.

4. कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत कोहली सौरव गांगुलीला मागे टाकले. विराट कर्णधार असताना 14 वेळा शुन्यावर बाद झालाय तर सौरभ गांगुली 13 वेळा अशाप्रकारे बाद झाला आहे..

5. इतकंच नाही तर, विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 28 वेळा शुन्यावर बाद झाला आहे.  यापैकी विराट 12 वेळा कसोटी, 13 वेळा वनडे सामन्यांत आणि टी-20 मध्ये तीन वेळा शुन्यावर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

6. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आज आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.

इंग्लंडचे सलामीवीर रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावा फटकावल्या व यजमान संघाकडून सामना खेचून आणला. रॉयचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले बटलर, डेविड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांनी अनुक्रमे 28, 24 आणि 26 धावांचे योगदान दिले.