IND vs BAN Test 2019: विराट कोहली याच्याकडे बांग्लादेशविरुद्ध टेस्ट मालिकेदरम्यान 'हे' रेकॉर्ड मोडत इतिहास घडविण्याची तयारीत, वाचा सविस्तर
विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघातील पहिला टेस्ट सामना इंदोरमध्ये 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. भारताविरुद्ध टी-2- मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर बांग्लादेश संघ आता कसोटी मालिकेत आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करेल. सध्या टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय भूमीवर विराट सेनेचा पराभव करणे जवळजवळ अशक्य आहे. दक्षिण आफ्रिकेचा 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत क्लीन-स्वीप करत भारतीय संघाने सलग 11 टेस्ट मालिका जिंकण्याच्या पराक्रमाची नोंद केली. बांगलादेश संघाने टी-20 मालिकेतील सामना जिंकला, पण कसोटी क्रिकेटमध्ये ते टीम इंडियाशी स्पर्धा करू शकतील की नाही हे पाहणे उत्साहाचे ठरेल. यासह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंदोरमध्ये इतिहास घडवण्याच्या जवळ आला आहे. (IND vs BAN 2019 Test: 1 विकेट घेत रविचंद्रन अश्विन याचा अनिल कुंबळे सह 'या' Elite यादीत होईल समावेश, हरभजन सिंह यालाही पिछाडीवर टाकण्याची संधी)

विराट जेव्हा-जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा एखाद दुसरा रेकॉर्ड नक्कीच मोडतो. असेच काहीसे इंदोर आणि नंतर कोलकाता टेस्ट दरम्यानही होऊ शकते. बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. पण, आता तो परतला आहे आणि संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. या मालिकेदरम्यान कोहलीला 7 विक्रमांची नोंद करण्याची संधी आहे. इतकेच नाही, तर या दरम्यान विराट रिकी पॉन्टिंग, ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर (Allan Border) यांसारख्या दिग्गजांना मागे टाकेल:

1. जवळ 15 दिवस सुट्टीवरून परतलेल्या कोहलीला बांग्लादेशविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल. इंदौर कसोटीत विराटने 147 धावा केल्या तर अधिक कसोटी धावांच्या यादीत तो गांगुलीला पिछाडीवर टाकेल. विराटने 7066 तर गांगुलीने 7212 धावा केल्या आहेत. दादा व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी भारतीय प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांचाही विक्रम कोहली मोडू शकतो. चॅपलने 7110 धावा केल्या आहेत आणि विराट त्यांच्या 45 धावा दूर आहे. त्याशिवाय माजी किवी फलंदाज स्टीफन फ्लेमिंग यालाही मागे टाकण्यासाठी विराटला 107 धावांची आवश्यकता आहे.

2. इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात 32 धावा करत कोहली कसोटीत कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण करेल. हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला कर्णधार असेल. शिवाय, वेगवान 5000 कसोटी धावा करणारा तो जगातील पहिला कर्णधारही होईल.

3. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये विराटने विक्रमी दुहेरी शतक केले आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याची बरोबरी केली होती. विराट आणि पॉन्टिंगने टेस्ट सामन्यात कर्णधार म्हणून 19 शतकांची नोंद केली आहे. बांग्लादेशविरुद्ध टेस्ट मालिकेत विराटने अजून एक शतक केले तर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत तो पॉन्टिंगला मागे टाकेल. इंदोरमध्ये शतक ठोकताच विराट पॉन्टिंगच्या पुढे दुसर्‍या स्थानावर पोहचेल. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ (Graeme Smith) असून त्याने 25 शतके ठोकली आहेत.

4. इंदोर सामन्यात कोहलीला विशेष विक्रम करण्याची संधी असेल. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर कोहली सर्वाधिक कसोटी सामने जिंकणार्‍या कर्णधारांच्या यादीत संयुक्तपणे पाचव्या स्थानावर पोहचेल. कोहलीने आतापर्यंत 51 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले असून 31 विजय मिळवले आहेत. त्याचवेळी बॉर्डरने 93 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 32 सामने जिंकले. इंदोर सामना जिंकत विराट बॉर्डरची बरोबरी करेल, तर कोलकाता मॅच जिंकत बॉर्डर यांना पिछाडीवर टाकेल.

5. विराटला रन-मशीन म्हणून ओळखले जाते. आणि बांग्लादेशविरुद्ध ही 'रनमशीन' पुन्हा एकदा धावा करण्यास सज्ज आहे. बांग्लादेशविरुद्ध भारतीय फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावांच्या यादीत विराट सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. विराटने बांग्लादेशविरुद्ध 256 धावा केल्या आहेत. 295 धावांसह मुरली विजय (Murali Vijay), गांगुली 317 आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) 381 धावांसह विराटच्या पुढे आहे. विराटला या मालिकेत 125 धावा करत या यादीत गंभीर आणि या सर्वांनां पछाडत तिसऱ्या क्रमांकावर पोहचण्याची संधी आहे.

6. सध्या क्रिकेटविश्वात विराट सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून ओळखला जातो. विराटला सचिनचा सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठीचा दावेदार मानले जाते. विराटने आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 69 शतकं केली आहेत. आणि सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन आणि पॉन्टिंगनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 71 शतकं केली. बांग्लादेशविरुद्ध दोन शतक करत विराट पॉन्टिंगची बरोबरी करत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहचेल.

7. विराट आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांची मागील काही वर्षांपासून तुलना केली जात आहे. या दोन्हीपैकी कोण श्रेष्ठ याबाबत दोघांच्या चाहत्यांमध्ये वाद होत असतो. अ‍ॅशेस मालिकेत स्मिथने तुफानी खेळी केली होती. या मालिकेत स्मिथने 26 वे आणि विराटने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 26 टेस्ट शतक केले. या मालिकेत विराट 27 वे शतक करत बॉर्डर आणि ग्रॅम यांची बरोबरी करेल. बॉर्डर आणि स्मिथने 27 टेस्ट शतकं नोंदवली आहेत.

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया वेगळ्या रंगात दिसत आहे. कोहलीच्या नेतृत्वात जगातील पहिल्या क्रमांकाच्या कसोटी संघाने 48 पैकी 35 कसोटी सामने जिंकले आहेत. त्यांच्या विजयाची टक्केवारी 72.91 आहे. बांग्लादेशबद्दल बोलायचे झाले तर हा संघ परदेशी भूमीवरील विजयासाठी संघर्ष करत आहे. परदेशात बांग्लादेशची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या संघाला शेवटच्या 13 टेस्ट सामन्यांपैकी 12 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.