IND vs BAN 2019 Test: 1 विकेट घेत रविचंद्रन अश्विन याचा अनिल कुंबळे सह 'या' Elite यादीत होईल समावेश, हरभजन सिंह यालाही पिछाडीवर टाकण्याची संधी
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरला इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) मध्ये भारतीय संघाने आजवर खेळलेल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये सर्व सामने जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 3 आणि 2 सामन्यांच्या टेस्ट मालिका खेळल्या आहेत. या दोन्ही संघाविरुद्ध भारतीय संघाने (Indian Team) निर्विवाद वर्चस्व कायम ठेवत क्लीन-स्वीप केला आहे. भारतीय संघ पुन्हा एकदा बांग्लादेशविरूद्ध टेस्ट मालिका जिंकून कसोटी चॅम्पियनशिपमधील विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. आणि तसे होण्यासाठी, टीम इंडियाचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला पुन्हा एकदा त्याचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. याशिवाय, दोन्ही संघ दुसरा टेस्ट सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर ऐतिहासिक डे/नाईट टेस्ट मॅच खेळेल. (IND vs BAN Test 2019: इंदोरमध्ये विराट कोहली आणि टीम इंडियाने नेट्समध्ये केला Pink Ball ने सराव, पाहा व्हिडिओ)

बांग्लादेशविरुद्ध टेस्ट मालिकेत अश्विन आधीपासूनच्या प्रख्यात कॅपमध्ये आणखी एक पंख जोडण्यासाठी तयार आहे. घरच्या मैदानात 250 टेस्ट विकेट्स पूर्ण करण्यापासून अश्विन फक्त एक विकेट दूर आहे आणि बांग्लादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात एक विकेट घेत हा पराक्रम करणारा तो आतापर्यंतचा तिसरा भारतीय खेळाडू बनेल. अश्विनने भारतात खेळल्या 80 सामन्यात 249 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळे (Anil Kumble) याने भारतात 115 डावांमध्ये सर्वाधिक 350 विकेट घेतल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानावर 103 डावात 265 विकेटसह हरभजन सिंह (Harbhajan Singh) आहे. एकूणच अश्विन हा एका भारतीयकडून घेतलेल्या सर्वाधिक विकेटच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. इतकच नाही तर, अश्विन हरभजनलाही मागे टाकू शकतो. भज्जीला पिछाडीवर करण्यासाठी अश्विनला 17 विकेटची गरज आहे. जर, अश्विन त्याच्या प्रभावी गोलंदाजीने ही कामगिरी केली, तर भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर पोहचेल.

घरच्या मैदानावर आणखी एक विजय मिळवण्यासाठी आणि आपल्या रेकॉर्ड लिस्टमध्ये अजून एका विक्रमाची भर घालण्यासअश्विन उत्सुक असेल. दोन संघांमध्ये आजवर झालेल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले असूनही भारत पाहुण्या संघाला कमी लेखत नाही. दोन्ही संघात यापूर्वी झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये बांग्लादेशने अष्टपैलू कामगिरी करत विजय मिळवला होता, आणि भारतावर पहिल्या मालिका पराभवाची नामुष्की ओढवली होती. पण, टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत पुढील दोन्ही सामने जिंकत मालिका 2-1 ने जिंकली.