ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात भारताने (India) अष्टपैलू कामगिरी करत विजय मिळवला. पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 341 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 304 धावांपर्यंत मजल मारता आली आणि ऑलआऊट झाले. भारताने ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) याने सर्वाधिक 98 धावा केल्या, तर मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) याने 46 धावा करून त्याला महत्वाची साथ दिली. आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाल्यावर स्मिथ झुंज देत राहिला, मात्र तो अपयशी ठरला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले. मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने 3 गडी, तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह याला 1 विकेट मिळाली. या सामन्यात विजय मिळवत भारताने ऑस्ट्रेलियाची मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. भारताने आजच्या सामन्यात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागात प्रभावी कामगिरी केली. दोन्ही संघ आता बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये तिसरा, निर्णायक सामना खेळतील. हा सामना रविवारी, 19 जानेवारीला खेळला जाईल. (मनीष पांडे याने डेविड वॉर्नर ला बाद करण्यासाठी पकडलेला एक हाती सुपरमॅन स्टाईल कॅच पाहून सर्वांनाच बसला धक्का, पाहा हा Video)
ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर (David Warner) ने 15 धावा केल्या आणि मनीषकडे मोहम्मद शमी याच्या चेंडूवर झेलबाद झाला. भारताविरुद्ध डेब्यू डाव खेळणारा लाबूशेननेही प्रभावित केले, मात्र तो वनडेमधील त्याचे पहिले अर्धशतक करू शकला नाही आणि 46 धावांवर जडेजाच्या चेंडूवर शमीकडे झेलबाद झाला. शेवटच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी करणारा फिंच राजकोटमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही आणि 33 धावांवर जडेजाने त्याला राहुलकडून स्टंप आऊट केले. स्मिथ शतक पूर्ण करू शकला आणि नर्व्हस नाईंटीचा शिकार बनला. स्मिथला 98 धावांवर कुलदीपने बोल्ड केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन (Shikhar Dhawan), कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत 6 विकेट्स गमावून टीम इंडियाने 340 धावा केल्या. कांगारू संघाकडून अॅडम झांपाने 3 गडी बाद केले, तर केन रिचर्डसनने दोन गडी बाद केले. यापूर्वी, पहिले बॅटिंग करत धवनने टीम इंडियाकडून सर्वाधिक 96 धावा केल्या. राहुल पाचव्या क्रमांकावर आला आणि त्याने 80 धावा केल्या. कोहलीनेही 78 धावा केल्या. विराट आणि धवनने दुसर्या विकेटसाठी सर्वाधिक 103 धावांची भागीदारी केली. उपकर्णधार रोहित शर्मानेही 42 धावांचे योगदान दिले.