विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

IND vs AUS 2020-21: महान फलंदाज आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांनी विराट कोहलीला (Virat Kohli) आतापर्यंतचा "सर्वात ऑस्ट्रेलियन नॉन-ऑस्ट्रेलियन" क्रिकेटर म्हणून संबोधले आहे. भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहलीची आक्रमकता भारताच्या फलंदाजांशी जुळत नाही, तर त्याची शैली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसारखीच आहे असं चॅपेल यांचे मत आहे.  चॅपेल यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूंची तुलना महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) आदर्शांशी केली आणि म्हणाले की कोहलीच्या आक्रमकतेने भारतीय क्रिकेटचा दृष्टीकोन बदलला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये चॅपेल यांनी लिहिले आहे की, “पूर्वीच्या अनेक भारतीयांनी क्रिकेट विरोधकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणे टाळले होते, कदाचित गांधीजींच्या मतांनुसार. हा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करणारा सौरव गांगुली (Sourav Ganguly) पहिला भारतीय कर्णधार होता. यामुळे काही प्रमाणात भारतात यश मिळाले, परंतु परदेशात ते तितकेसे प्रभावी ठरले नाही.’’ (IND vs AUS Test 2020: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आजमावणार हात, टेस्ट मालिकेत 'विराट'सेनेपुढे असणार 'हे' चॅलेंज)

ते म्हणाले, “विराट कोहली शांततेने उत्तर देण्यावर विश्वास ठेवत नाहीत. तो आक्रमक शैलीचा समर्थक आहे आणि विरोधकांवर वर्चस्व गाजवण्याचा त्याचा प्रयत्न असतो.’’ त्यांनी पुढे म्हटले की, "कोहली हा आतापर्यंतचा सर्वाधिक ऑस्ट्रेलियाचा नॉन-ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. तो नवीन भारताचे प्रतीक आहेत. क्रिकेटच्या सामर्थ्यवान देशाचा कर्णधार म्हणून या खेळाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी त्याला चांगलीच समजली आहे.’’ 17 डिसेंबरपासून बहुप्रतिक्षित चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या मॅचनंतर विराट पहिल्या बाळाच्या जन्मानिमित्त मायदेशी रवाना होईल.

चॅपेल म्हणाले की, कोहली सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली क्रिकेट खेळाडू आहे. "कोहलीसह स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन हे आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या शर्यतीत आहेत. रेकॉर्ड स्मिथच्या बाजूने आहेत पण तिघांना वेगळे करणे कठीण काम आहे. तथापि, जागतिक क्रिकेटच्या सध्याच्या परिस्थितीत कोहली हा सर्वात महत्वाचा खेळाडू आहे.’’ ते म्हणाले, “कोहली खूप प्रभावी आहे. त्याच्यावर सर्वात जास्त दबाव असतो. अब्जावधी लोकांच्या आशा व आकांक्षेने फलंदाजी करणे खूप अवघड आहे, ज्याला कमी लेखू शकत नाही.’’