IND vs AUS 2020-21: ब्रिस्बेन येथे चौथ्या टेस्टवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया बॉसचे स्पष्टीकरण, BCCI बाबत केले 'हे' विधान
ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड (Photo Credit: Twitter/cricketcomau)

IND vs AUS 2020-21: ब्रिस्बेनच्या गाब्बा (Gabba) येथे भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेचा चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. क्वारंटाइनच्या कठोर नियमांमुळे ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्याऐवजी सिडनीमध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी टीम इंडिया इच्छूक असल्याचे वृत्त समोर आले होते. ज्यानंतर या विषयावर वाद सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांनीही यावर आपले निवेदन दिले आणि आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले (Nick Hockley) यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. कठोर नियमांमुळे ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यास भारतीय संघ टाळाटाळ करीत असल्याच्या वृत्तास हॉकी यांनी सोमवारी फेटाळून लावले. हॉकी म्हणाले की, भारतीय क्रिकेट बोर्ड क्वीन्सलँडमधील क्वारंटाइन नियमाने (Queensland Quarantine Rules) चांगले "परिचित (आणि) समर्थक" आहे. (IND vs AUS 3rd Test: सिडनी टेस्ट मॅचसाठी असा असेल टीम इंडियाचा Playing XI, पहा कोणाला मिळेल संघात स्थान)

ते म्हणाले, “आम्ही दररोज बीसीसीआय मध्ये आमच्या सहकाऱ्यांशी बोलतो." त्यांनी पुढे ठामपणे म्हटले की, "अतिथी संघाचे मंडळ खूपच समर्थनीय आहे आणि आम्हाला त्याच्या बाजूने कोणतीही औपचारिक सूचना प्राप्त झाली नाही. आम्ही निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही संघांना खेळायचे आहे." चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथा सामना 15 जानेवारीपासून गाब्बा येथे आयोजित होणार आहे. ब्रिस्बेन कसोटी संकटात सापडल्याचा दावा ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केला आहे. कारण कठोर नियमांमुळे टीम इंडिया तिथे जाण्यास अनिच्छुक आहेत.

अज्ञात सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाला चौथा कसोटी सामना सिडनी येथेही व्हावा अशी इच्छा आहे. क्वीन्सलँडने शहर व आसपासच्या भागात कोविड-19 च्या वाढत्या घटनांमुळे न्यू साउथ वेल्सहून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी, ज्याची सिडनी ही राजधानी आहे, सीमा बंद केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील सर्व खेळाडू व सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस टेस्ट नकारात्मक आल्यानंतर सोमवारी सिडनीला रवाना झाले. जैव-सुरक्षा प्रोटोकॉलच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली उपकर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर शुभमन गिल, यष्टीरक्षक रिषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ अशा पाच भारतीय खेळाडूंना क्वारंटाइन केल्याच्या दोन दिवसांनी हॉकी यांनी हे विधान केले.