विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 1: ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडिलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला दोन झटके बसल्यावर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. पुजारा आणि विराटने 68 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या शंभरी पार केली. पहिल्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाने 55 ओव्हरमध्ये 3 बाद 107 धावांपर्यंत मजल मारली. पुजारा 43 धावा आणि कोहली नाबाद 39 धावा करून खेळत आहेत. भारताविरद्ध पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सलामी जोडी वगळता अन्य विकेट घेण्यात अपयश आले. संघाला विकेट घेण्याची संधी मिळाली पण खेळाडूंच्या गचाळ फिल्डिंगमुळे विराट-पुजारा मोठा डाव खेळण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाकडून सध्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनाच विकेट मिळाले आहेत.

दरम्यान, भारतीय कर्णधार कोहलीने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, पण पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात कांगारू गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. स्टार्कने पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. शुभमन गिलच्या जागी संघात स्थान मिळालेल्या पृथ्वीने निराशानक कामगिरीचे सत्र यंदाही सुरूच ठेवले. खराब फुटवर्कमुळे बॉल पृथ्वीच्या बॅटची कड घेऊन स्टम्पवर थेट जाऊन आदळला. यानंतर मयंक अग्रवालने पुजारासोबत खेळपट्टीवर स्थिरावत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.दोघांनी 32 धावांची भागीदारी केली, मात्र मयंक अत्यंत धीम्यागतीने खेळत होता. कमिन्सच्या एका चेंडूवर अग्रवाल फसला. टप्पा पडून आता आलेला चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि मयंक 17 धावांवर माघारी परतला.

आजपासून सुरु झालेल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी अष्टपैलू कॅमरुन ग्रीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दुसरीकडे, टीम इंडियाने शुभमनच्या जागी पृथ्वी तर सराव सामन्यातील शतकवीर रिषभ पंतच्या जागी रिद्धिमान साहाला पसंती दिली.