IND vs AUS 1st T20I: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि दौऱ्यावर आलेला भारतीय संघात (Indian Team) आजपासून टी-20 ची लढत सुरु होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हलमध्ये (Manuka Oval) खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेत पराभूत झालेल्या भारतीय संघाकडे आजपासून सुरु होणाऱ्या मालिकेत यजमान संघाविरुद्ध बदल घेण्याची चांगली संधी आहे. शिवाय, टी-20 मध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर वरचष्मा आहे. एकदिवसीय मालिकेच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ (India Tour of Australia) आता लयीत परतण्याच्या प्रयत्नात आहे. मालिकेचा शेवटचा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, एकदिवसीय विजयाची लय मिळवल्यानंतर त्याचा संघ टी-20 मालिकेसाठी मैदानावर उतरेल. आतापर्यंत दोन्ही संघांमधील टी -20 सामन्यांच्या संघर्षाची दखल घेतल्यास यजमान संघावर भारतीय संघाचे वर्चस्व असल्याचे दिसुन येत आहे. (IND vs AUS 1st T20I: पहिल्या टी-20 साठी असा असेल भारत-ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन, कॅनबेरा येथे 'हे' 11 खेळाडू उतरणार मैदानात)
भारत आणि ऑस्ट्रेलिया आजवर 20 वेळा आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आमने-सामने आले आहेत. त्यापैकी भारताने एकूण 11 सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलिया 8 वेळा जिंकला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यांविषयी बोलताना येथे दोन्ही संघांमध्ये एकूण 9 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 5 तर यजमान संघाने केवळ 3 मध्ये विजय मिळवला आहे. मागील दौर्यावर खेळलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. शिवाय, दोन्ही देशांत ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा देखील भारताने केल्या आहेत. 2016 मध्ये सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारताने तीन विकेट गमावून 200 धावा केल्या होत्या. तर दोन्ही देशांतील क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 317 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्सी कर्णधार आरोन फिंचचे नाव येते.
दरम्यान, टीम इंडिया टी-20 साठी सध्या बरीच संतुलित दिसत आहे. मागील न्यूझीलंड दौऱ्यावर भारताने किवी संघाचा 5 टी-20 मॅचच्या मालिकेत दारुण पराभव केला होता. यामध्ये दोन सुपर ओव्हर सामन्यांचाही समावेश आहे.