ICC WTC Final: भारताविरुद्ध Tim Southee विराट कोहलीची विकेट घेण्यास तयार आहे? चाहत्याच्या प्रश्नावर किवी गोलंदाजाने दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

ICC WTC Final: इंग्लंड विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि 18 जूनपासून भारताविरुद्ध (India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यासाठी न्यूझीलंड (New Zealand) संघ युके (UK) येथे दाखल झालेला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदीने (Tim Southee) खुलासा केला की साऊथॅम्प्टन (Southampton) येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट मौल्यवान ठरेल. आगामी 2 सामन्यांच्या कसोटी मालिका आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंड दौर्‍यावर जाताना साउदीने एका चाहत्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना हे विधान केले. “तू विराट कोहलीची विकेट घेणार आहेस, दोस्त?” टिम साउदीने उत्तर देताना म्हटले, “ते छान होईल.” (ICC WTC Final: जसप्रीत बुमराह-शमी सोबत टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कोण असेल भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज, Sanjay Manjrekar ने ‘या’ मुंबईकरची केली निवड)

उल्लेखनीय आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये साउदी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. साउदीने किवी संघासाठी या चॅम्पियनशिप स्पर्धेत 50 पेक्षा अधिक विकेट घेतल्या असून तो या स्पर्धेत न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. विराट कोहली आणि इतर भारतीय फलंदाजांसाठी तो चिंतेचा विषय ठरण्याची अपेक्षा आहे कारण इंग्लंडच्या परिस्थितीत त्याला काही मदत मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे साउदी भारतीय कर्णधार विराटची कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 10 वेळा शिकार करणारा एकमेव गोलंदाज आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावेळी फेब्रुवारी 2020 मध्ये किवी वेगवान गोलंदाजाने कमाल कामगिरी केली होती. शिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये साऊदीने 8 सामन्यांत 39 विकेट्स घेतल्या असून एकूणच त्याने किवीसाठी 77 कसोटी सामन्यांत 302 विकेट्स काढल्या आहेत.

दरम्यान, ऑकलंड ते सिंगापूर मार्गे उड्डाण करून न्यूझीलंडच्या कसोटी संघातील अधिकतर खेळाडूंचे रविवारी दुपारी लंडनमध्ये आगमन झाले. कोविड-19 महामारी दरम्यान, हॉटेल रूममध्ये पहिले तीन दिवस क्वारंटाईन घालवले जातील, त्यानंतर नकारात्मक कोविड अहवालानंतर 4-6 दिवसांनी सहाचे मिनी-प्रशिक्षण गट स्थापित केले जातील. दुसरीकडे, जानेवारी 2016 पासून आतापर्यंत कसोटी सामन्यांविषयी बोलताना टीम इंडियाने एकूण 55 कसोटी सामने खेळले असून 35 सामने त्यांनी जिंकले तर 12 कसोटी सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तसेच न्यूझीलंडने यादरम्यान 40 कसोटी सामने खेळले. ज्यात 22 विजय, 12 पराभव आणि 6 सामने अनिर्णित राहिले होते. शिवाय, किवी टीमने 2020 दौऱ्यावरील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सफाया केला होता.