आयसीसी (ICC)विश्वचषक आता आपल्या अंतिम चरणी येऊन पोहचला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय (India) संघाने बांग्लादेश (Bangladesh) संघाचा पराभव करत सेमीफायनल फेरी गाठली आहे. दुसरीकडे, बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये यजमान इंग्लंड (England) ने न्यूझीलंड (New Zealand) संघाला अक्षरशः लोळावले. त्यामुळे इंग्लंडचा संघही सेमीफाइनलमध्ये दाखल झाला असून चौथा संघ न्यूझीलंड असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आता उपांत्य फेरीत भारतीय संघ पुन्हा भगव्या रंगांच्या कपड्यांमध्ये मैदानात उतरण्याची शक्यता आहे. (ICC World Cup 2019 Semi-Final: विश्वचषक उपांत्यपूर्व सामन्यात टीम इंडियाला कोणाचे आव्हान? जाणून घ्या संभाव्य सेमिफायनल संघ)
बुधवारी झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) पहिल्या, भारत दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील साखळी सामन्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील सामना कोणाशी होणार हे ठरेल. सध्या, ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी पाहता दक्षिण आफ्रिकेकडून त्यांचा पराभव होण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे शनिवारी भारताचा सामना श्रीलंका (Sri Lanka) शी होणार आहे. श्रीलंकेची कामगिरी पाहता हा सामना भारत हा सामना आरामात जिंकू शकेल असं बोललं जातं आहे. त्यामुळे हे दोन्ही निकाल लागले तर सध्याच्या गुणतालिकेप्रमाणेच संघांचे क्रमांक कायम राहतील.
सेमीफाइनलमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी दोन हात करेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतीम सामन्यातील प्रवेशासाठी लढतील. उपांत्य फेरीतील पहिला सामना 9 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्याने होईल. 11 ला होणाऱ्या दुसऱ्या सेमीफाइनलमध्ये भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी सज्ज असेल. त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना असेल तर विश्वचषकाच्या नियमाप्रमाणे भारताला त्यांच्या ‘अवे’ जर्सीमध्ये म्हणजेच ऑरेंज जर्सीमध्येच हा सामना खेळावा लागेल.
याआधी साखळी फेरीत टीम इंडिया ने इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये ऑरेंज रंगाची जर्सी परिधान केली होती. या सामन्यामध्ये भारताचा 31 धावांनी पराभव झाला होता. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी ऑरेंजे जर्सीला भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरवले होते.