ICC Test Rankings: विराट कोहली, पॅट कमिन्स यांचे अव्वल स्थान कायम; क्विंटन डी कॉक याने घेतली मोठी झेप
विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) ने वर्ष 2019 मध्ये अखेरची कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार (Indian Team) आणि मजबूत फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत पहिले स्थान कायम ठेवले आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने दुसरे स्थान कायम राखले आहे. कोहलीचे 928 गुणांसह स्मिथच्या 911 गुणांच्या खूप पुढे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचाक्विंटन डी कॉक याने मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात डिकॉकने 100 हून अधिक धावा केल्या, ज्यामुळे त्याला बऱ्याच गुणांचा फायदा झाला आहे. डी कॉक पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये परतला आहे. ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत डिकॉक दहाव्या क्रमांकावर आहे.  या मॅचपूर्वी डी कॉक 18 व्या स्थानी होता. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या या विकेटकीपर फलंदाजाने 8 स्थानांची कमाई केली आहे. (रिकी पॉन्टिंग ने केली विराट कोहली ची Decade च्या टेस्ट कर्णधार म्हणून निवड, 4 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर स्मिथचे 911 गुण होते. आणि दुसरा सामना संपल्यानंतरही त्याच्याकडे 911 गुण आहेत, तर विराट 928 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, मार्नस लाबूशेन पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर पोहचला आहे, आणि भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याची चौथ्यावरुन पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीबद्दल बोलताना किवी वेगवान गोलंदाज नील वॅग्नर तिसऱ्या स्थानावरुन दुसर्‍या स्थानावर पोहचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो राबाद दुसर्‍या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी करणारा पॅट कमिन्स (Pat Cummins) 902 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. वर्नोन फिलँडर 8 व्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आला आहे. तथापि, या मालिकेनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याशिवाय आर अश्विन आणि मोहम्मद शमी हेही पहिल्या दहामध्ये आले आहे.