ICC Test Rankings: रोहित शर्माने सर केलं आणखी एक विक्रमी शिखर; आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांनाही झाला फायदा
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हलमध्ये 157 धावांच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) लक्षणीय वाढ झाली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गोलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर पोहचला आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीनेही (Virat Kohli) गुण मिळवले आहेत. ओव्हल मैदानावर झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे आव्हान दिले होते प्रत्युत्तरात इंग्लिश टीम 210 धावाच करू शकली. आणि विराट कोहलीचा भारतीय संघ मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्यात यशस्वी झाला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात 127 धावांची धमाकेदार खेळी करणाऱ्या रोहित शर्माने नवीन आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये एक विक्रमी शिखर सर केले आहे. चौथ्या टेस्ट सामन्यापूर्वी रोहितने 773 गुणांसह कसोटी क्रमवारीत विराट कोहलीला ढकलत पाचव्या स्थानावर झेप घेतली होती. आणि आता चौथ्या सामन्यानंतर रोहितने 40 गुणांची कमाई केली आहे. रोहितचे क्रमवारीत पाचवे स्थान कायम असले तर त्याची रेटिंग 813 झाली आहे.

रोहितने पहिल्यांदाच टेस्ट करिअरमध्ये 800 पेक्षा अधिक गुणांची रेटिंग मिळवली आहे. यासह त्याने विराटवर आपली आघाडी देखील वाढवली आहे. याशिवाय इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीने दोन डावांमध्ये अनुक्रमे 50 आणि 44 धावांच्या जोरावर 20 गुण मिळवले आणि एकूण 783 गुणांसह क्रमवारीत सहाव्या स्थानावर कायम आहे. तसेच रिषभ पंत 690 गुणांसह 13 व्या स्थानावर आहे, तर अजिंक्य रहाणेलाही दोन स्थानांची हानी झाली आहे आणि तो टॉप-20 च्या बाहेर पडला आहे. दुसरीकडे, गोलंदाजांच्या यादीत चौथ्या कसोटीत बुमराहला त्याच्या उत्कृष्ट खेळीचे फळ मिळाले. बुमराहने सामन्याच्या शेवटच्या दिवशी जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर चार विकेट्स घेतल्या. यामध्ये ओली पोली आणि जॉनी बेअरस्टो यांच्या प्रमुख विकेट्सही सामील होत्या. दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी एक विकेट घेणारा इंग्लंडचा जेम्स अँडरसन सातव्या स्थानावर घसरला आहे.

संघाचा कर्णधार जो रूट 903 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. रूटनंतर न्यूझीलंडचा केन विल्यमसन (901) आणि ऑस्ट्रेलियन जोडी स्टीव्ह स्मिथ (891) आणि मार्नस लाबूशेन (878) आहेत. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाने आपले स्थान तीनवर कायम राखले आहे, तर रवीचंद्रन अश्विन, जो इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत अद्याप खेळलेला नाही, तो पाचव्या स्थानावर आहे. शिवाय, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत क्रिस वोक्स पहिल्या 10 मध्ये पोहचला आहे.