ICC Test Championship Points Table: वेस्ट इंडिजच्या विजयानंतर टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत झाले बदल, पाहा काय आहे संघांची स्थिती
जॉन कॅम्पबेल आणि क्रेग ब्रेथवेट (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसनंतर इंग्लंडमध्ये (England) खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडीजने (West Indies) 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात दिलेल्या 200 धावांचे लक्ष्य विंडीज टीमने 4 गडी राखून गाठले आणि मालिकेत आघाडी घेतली. दोन्ही संघांमधील ही तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) एक भाग आहे. इंग्लंडचा पराभव करू वेस्ट इंडीजने जागतिक कसोटी स्पर्धेत 40 गुण मिळवत आपले खाते उघडले आहे. विंडीजच्या विजयाने टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत काही बदल झाले. इंग्लंड सध्या 146 गुणांसह चौथ्या स्थानी आहे, तर या विजयासह वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेला (South Africa) ओव्हरटेक करत सातवा क्रमांक पटकावला. आफ्रिका टीमचे 2 मालिकेत 7 सामन्यांसह 24 गुण आहेत. गुणतालिकेत अव्वल संघांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. (ENG vs WI 1st Test: जेम्स अँडरसनच्या 'या' कृतीने सोशल मीडियावर वादाला सुरुवात, बॉलवर लाळ लावल्याचा यूजर्सकडून आरोप, पाहा Video)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत सध्या अव्वल क्रमांकावर आहे. आयसीसी चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून टीम इंडियाने केवळ दोन कसोटी सामने गमावले आहेत. 8 पैकी 7 कसोटी सामने जिंकले आहेत. 360 गुणांसह तो सुरुवातीपासूनच अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 296 गुणांसह दुसर्‍या स्थानावर तर भारतविरुद्ध मालिका जिंकून न्यूझीलंड 180 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजने उर्वरित दोन्ही कसोटी सामने जिंकले तर ते श्रीलंकेला पछाडून सहाव्या क्रमांकावर पोहोचू शकतात. श्रीलंकेचे सध्या 80 गुण असून ते सहाव्या स्थानावर आहेत.

चॅम्पियनशिपच्या लीग टप्प्याच्या शेवटी सर्वाधिक गुणांसह दोन संघ जून 2021 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी चँपियनशिपचा अंतिम सामना खेळतील आणि विजयी संघ क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या कसोटी विश्वचषकाचा विजेता ठरेल. मात्र, कोरोनामुळे बर्‍याच मालिका रद्द झाल्या किंवा पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी आयसीसी त्यांच्यावर अंतिम निर्णय घेईल.