भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी टेस्ट (Photo Credit: PTI)

ICC Test Championship Points Table: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील सिडनी टेस्ट (Sydney Test) पाचव्या दिवशी अनिर्णीत सुटला. यासह दोन्ही संघांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअयनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेतील पहिले दोन स्थान कायम ठेवले आहे. टीम इंडिया (Team India) सध्या गुणतालिकेत दुसऱ्या तर कांगारू संघ पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत. मात्र, कांगारू संघ फक्त विजयाच्या टक्केवारीच्या जोरावर अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची टेस्ट चॅम्पियनशिप सामन्यांची विजयी टक्केवारी 73.8 आहे तर टीम इंडियाची 70.2 अशी विजयी टक्केवारी आहे. रोमांचक बाब म्हणजे भारत आणि न्यूझीलंड संघाचं विजयाच्या टक्केवारीत फक्त 0.2 चा फरक आहे. "सिडनी येथे अविश्वसनीय लढाईनंतर दोन्ही संघांना आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील पहिले दोन स्थान कायम राखण्यास मदत झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 0.2 टक्के फरक," आयसीसीने ट्विट केले. (ICC World Test Championship: आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 'या' 5 फलंदाजांनी केल्या सर्वाधिक धावा, यादीत भारतीय देखील शामिल)

पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करत न्यूझीलंडने सर्वाधिक 120 गुण मिळवले होते ज्यामुळे त्यांची गुणसंख्या 420 झाली आहेत. पाकिस्तानपूर्वी किवी टीमने मागील वर्षी वेस्ट इंडिज आणि जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध क्लीन स्वीप करत टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी आपली दावेदारी दर्शवली होती. ब्लॅक कॅप्स 70.0 विजयाच्या टक्केवारीसह तिसर्‍या स्थानावर आहेत. कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या 2020 मध्ये क्रिकेट स्पर्धांचे नुकसान झाल्यानंतर आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमात काही बदल केले ज्यात आता फायनल खेळणाऱ्या दोन संघांची निवड पॉईंट्सद्वारे न होता विजयाच्या टक्केवारीवर अवलंबून असेल. टक्केवारीच्या आधारावर लीगच्या शेवटी अंतिम टॉप-2 संघ इंग्लडच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या फायनलमध्ये आमने-सामने येतील. जून 2021 मध्ये फायनल सामन्याचे आयोजन केले जाणार आहे.

दरम्यान, चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने ऑस्ट्रेलिया आणि भारत आता ब्रिस्बेनच्या गाब्बा येथे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या अंतिम कसोटी सामन्यात एकमेकांशी भिडतील. यासामन्यापूर्वी दोन्ही संघापुढे खेळाडूंचे दुखापतींची मोठे डोकेदुखी आहे. ऑस्ट्रेलियाच्या विल पुकोवस्कीला सिडनी टेस्टच्या अंतिम दिवशी फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. शिवाय, रवींद्र जडेजा, रिषभ पंत यांना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तर हनुमा विहारी आणि आर अश्विन यांना पाचव्या दिवशी दुखापत झाली. ज्यामुळे आता या खेळाडूंच्या अंतिम टेस्ट मॅच खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.