विराट कोहली (Photo Credit: PTI)

ICC T20I Rankings: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील कॅलेंडरमधील अंतिम टी-20 मालिकेनंतर आयसीसीने टी-20 नवीन क्रमवारी (ICC T20I Rankings) जाहीर केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) एक स्थानाची झेप घेत सातवे स्थान पटकावले तर न्यूझीलंडचे टिम साउदी (Tim Southee) आणि टिम सेफर्ट (Tim Seifert) यांनी टी-20 क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान मिळवले आहे. साउदी आणि रेफर्ट यांनी अनुक्रमे गोलंदाज आणि फलंदाजांच्यापहिल्या दहाच्या यादीत स्थान मिळवले आहे. पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) घरच्या मालिकेत सेफर्टने एकूण 176 धावा करत करिअरमधील सर्वोत्तम नववे स्थान मिळवले तर मालिकेत साउदीच्या सहा विकेट्सने त्याला 13व्या स्थानावरून सातवे स्थान मिळवून दिले आहे. याशिवाय, पहिल्या पाच फलंदाजांच्या यादीत कोणताही बदल झालेला नाही. टी-20 फलंदाजीच्या क्रमवारीत इंग्लंडचा डेविड मलानने पहिले तर पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या आणि भारताच्या केएल राहुलने (KL Rahul) तिसरे स्थान कायम ठेवले आहे. (ICC Test Rankings: अ‍ॅडिलेडमधील अर्धशतकाचा विराट कोहलीला टेस्ट रँकिंगमध्ये फायदा; जोश हेजलवुड टॉप-5 तर अश्विनची टॉप-10 मध्ये एंट्री)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच चौथ्या तर दक्षिण आफ्रिकेचा व्हॅन डर ड्यूसेन पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडून दुसर्‍या सामन्यात नाबाद 99 धावां केलेला मोहम्मद हफीझला 14 स्थानांचा फायदा झाला असून त्याने 33वे स्थान पटकावले आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशीद खान पहिला तर त्याचा साथीदार मुजीब उर रहमान दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा आदिल रशीद तिसर्‍या आणि ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झांपा चौथा आहे. पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा तबरेज शमसी आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे पहिल्या दहा गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. फहीम अशरफने 22 स्थानांची झेप घेत 13व्या स्थान मिळवले तर, शाहीन आफ्रिदी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 16व्या स्थानावर आणि मालिकेत हरीफ रऊफच्या 5 विकेटने 67व्या स्थान मिळवून दिले आहे.

दुसरीकडे, आयसीसी पुरुष टी-20 संघांच्या क्रमवारीत पाकिस्तानला तीन गुणांचे नुकसान झाले तर न्यूझीलंडने तीन गुणांची कमाई केली आहे पण दोघांनी अनुक्रमे चौथे व सहावे स्थान कायम राखले आहे.