हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांची IPL मधील खेळण्याची संधी हुकणार?
Hardik Pandya and KL Rahul (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता करण जोहर (Karan Johar) याचा लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 6) मध्ये काही दिवसांपूर्वी भारतीय संघातील क्रिकेटर केएल राहुल (K L Rahul)  आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी महिलांवरील विधानामुळे हार्दिक पांड्यावर प्रचंड टीका करण्यात आली. तसेच सचिनपेक्षा विराट अधिक उत्तम खेळाडू असल्याचे म्हटले होते. यामुळे पांड्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. टीका झाल्यानंतर पांड्याने ट्वीटरवरुन जाहीर माफी मागितली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या प्रकरणी गंभीर दखल घेत या दोघांना निलंबित करण्याची कारवाई केली. त्यानुसार  हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. त्याचसोबत या दोघांना आता इंडियन प्रिमिअर लीग (IPL) मध्ये खेळवू नका अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी दोघांची चौकशी होणार असल्याने ऑस्ट्रेलियावरुन त्यांना भारतात बोलावण्यात आले आहे. (हेही वाचा- हार्दिक पांड्या, के एल राहुल यांच्यावर दोन ODI सामन्यांसाठी बंदी? Koffee With Karan कार्यक्रमातील वक्तव्ये भोवणार?)

तसेच केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी 'कॉफी विथ करण' या टॉक शो कार्यक्रमाला जाण्यापूर्वी परवानी घेतली होती का असा प्रश्न बीसीसीआय कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी उपस्थित केला आहे. तर सोशळ मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांमध्ये ही या दोघांच्या बाबतीत संताप व्यक्त होत आहे.