करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 6' (Koffee With Karan 6) चॅट शो मध्ये मनमोकळेपणाने व्यक्त होणे, क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना चांगलेच महागात पडले आहे. या शोमध्ये हार्दिक पांड्याने महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्याच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. नेटकऱ्यांनीही सोशल मीडियातही हार्दिकला चांगलेच ट्रोल केले. मात्र टिकेनंतर हार्दिक पांड्याने ट्विट करत माफी मागितली.
हा सर्व वाद रंगल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) देखील हार्दिक पांड्या आणि केएल राहुल या दोघांनाही नोटीस पाठवली आहे. या नोटीसला 24 तासांच्या आत उत्तर देण्याची ताकीदही बीसीसीआयने दिली आहे.
बीसीसीआयचे चेअरमॅन विनोद राय यांनी या बातमीला दुजोरा देत पीटीआयशी (PTI) बोलताना सांगितले की, "आम्ही हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना शो कॉज नोटीस (Show Cause Notice) पाठवली आहे आणि त्यावर उत्तर देण्यासाठी 24 तासांची मूदत दिली आहे. पुढे ते म्हणाले की, ज्या शो चा क्रिकेटशी काही संबंध नाही त्या शो मध्ये जाण्याची काही आवश्यकताही नाही."
त्यामुळे या वादानंतर बीसीसीआय 'कॉफी विथ करण 6' यासारख्या टीव्ही शो मध्ये क्रिकेटर्सला जाण्यासाठी बंदी घालू शकतं.