Happy Birthday Rohit Sharma: भारतीय क्रिकेटमधील (Indian Circket) आधुनिक काळातील एक महान खेळाडू, रोहित शर्मा (Rohit Sharma) गेल्या 13 वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) आपला वाढदिवस साजरा करत आहे. यंदा देखील रोहित आपल्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या साथीदारांसह आपला 34वा वाढदिवस साजरा करेल. 2007 च्या सुरुवातीच्या काळात रोहित शर्माने भारतामध्ये पदार्पण केले पण 2013 मध्ये टीम इंडियासाठी सलामीला आल्यापासून रोहितच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली. तेव्हा पासून रोहितने आपली बॅटिंग, आणि फटकेबाजीने आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सर्वाधिक टीका सहन करणाऱ्या क्रिकेटपटूपासून सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक, ‘हिटमॅन’ आधुनिक काळातील एक महान फलंदाज बनला आहे. आज रोहितच्या वाढदिवशी आपण रोहितच्या टॉप-5 वर्ल्ड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया जे जाणून जगातील दिग्गज फलंदाजही चक्रावून जातील. (Rohit Sharma याच्यानंतर ‘हे’ 3 बनू शकतात Mumbai Indians चे कर्णधार, 5-वेळा आयपीएल चॅम्पियनकडे आहेत दमदार पर्याय)
1. 2019 हे रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. 2019 च्या विश्वचषकात रोहितने 5 विश्वविक्रमी शतकांसह रोहितने 9 सामन्यात सर्वाधिक 648 धावा ठोकल्या. शिवाय, विश्वचषकाच्या एका आवृत्तीत पाच शतकी धावा करणारा रोहित पहिला खेळाडू आहे.
2. 2019 मध्ये रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा शतके होती जी सात वेगवेगळ्या संघाविरुद्ध त्याने केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका कॅलेंडर वर्षात सात वेगवेगळ्या टीम विरुद्ध शतक ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. वर्ल्ड कप 2019 दरम्यान त्याने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंकाविरुद्ध शतके ठोकली होती. त्यांनतर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीला आणि 2019 च्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी शंभरी धावसंख्या पार केली होती.
3. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशकांचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील रोहितच्या नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध दोन असे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतकी खेळी केली आहे. इतकंच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम देखील रोहितने नोंदवला आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 264 धावांची खेळी केली होती.
4. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित अधिराज्य आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रोहितने आजवर सर्वाधिक 4 टी-20 शतके केली आहे ज्यामध्ये संयुक्तपणे सर्वात वेगवान शतकाचा देखील समावेश आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध इंदोर सामन्यात 2017 मध्ये 35 चेंडूत सर्वात वेगवान टी-20 शतक ठोकले होते. रोहित व दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर या प्रकरणात संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत.
5. रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा खरा सिक्सर किंग आहे. रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जितके सिक्स खेचले आहे त्याच्या जवळ सध्याच्या भारतीय संघातील कोणताही फलंदाज पोहचू शकलेला नाही. रोहितने 111 टी-20 सामन्यात एकूण 133 षटकार मारले आहेत.