India-England T20 Series: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका रद्द न झाल्यास आत्महत्या करेल; गुजरातमधील एका व्यक्तीची चांदखेडा पोलिसांना धमकी
Narendra Modi Stadium (Photo Credit: Twitter)

भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेला (India-England T20 Series 2021) वाढत्या कोरोनाचा फटका बसला आहे. अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. मात्र, गुजरातमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने उर्वरित सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार असल्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने (GCA) समोवारी घेतला आहे. याचदरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेल, अशी धमकी गुजरातमधील एका अज्ञात व्यक्तीने चांदखेडा पोलिसांना (Chandkheda police) दिली आहे.

याप्रकरणी अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून पंकज पटेल असे त्याचे नाव आहे. तो गुजरातच्या गांधीनगरमधील रहिवाशी असल्याचे कळत आहे. त्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.व्ही. पटेल यांना 12 मार्च रोजी ही धमकी दिली होती. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगनुसार, पंकजने पोलिस निरीक्षकास कोविड 19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे की नाही, असा प्रश्न विचारला आहे. तसेच या सामन्यात अंदाजे 75 हजार प्रेक्षक उपस्थिती दर्शवतात. सध्या कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेमुळे रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेल, अशी धमकी त्याने पोलीस निरीक्षकास दिली आहे. याप्रकरणी पंकज विरोधात भारतीय दंड संहिता कलम 505 (2), 507, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- India vs England T20I Series 2021: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अखेरचे 3 टी-20 सामने प्रेक्षकांविना; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम केले गेले. 1,10,000 क्षमता असलेले जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणार्‍या नवीन स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते झाले आहे.