IND vs ENG (Photo Credit - X)

चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler)  खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  करत आहे. दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी जास्तीत जास्त गर्दी आणण्यासाठी, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने काही मोठे निर्णय घेतले आहेत.

चाहत्यांना मिळणार मोफत बस आणि मेट्रो प्रवासाचा लाभ  

चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यासाठी तिकिटांसह चाहत्यांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. तिकीटधारकांना अप आणि डाउन दोन्ही प्रवासांसाठी मोफत मेट्रो प्रवासाचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे, मद्रास ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MTC) ने चेपॉक येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी तिकिटे असलेल्या चाहत्यांसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. मेट्रोप्रमाणे, तिकीटधारकांना अप आणि डाउन दोन्ही प्रवासांसाठी मोफत बस प्रवासाचा लाभ घेता येईल. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांचे चेहरे आनंदाने उजळले.

हे देखील वाचा: IND vs ENG 2nd T20I 2025: दुसऱ्या टी-20 मध्येही मोहम्मद शमीला संघात मिळणार नाही स्थान? मोठे कारण आले समोर

चेन्नईमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना 2018 मध्ये खेळला गेला

चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम 2018 नंतर पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाने या मैदानावर शेवटचा टी-20 सामना 11 नोव्हेंबर 2018 रोजी खेळला होता. हा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना जिंकला होता. त्याआधी 2012 मध्ये, भारतीय संघाने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामना खेळला, ज्यामध्ये त्यांना एका धावाने पराभव स्वीकारावा लागला.