Mohammed Shami (Photo Credit - X)

चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) 25 जानेवारीला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळला जाईल. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. आता, चेन्नईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शमीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येवु शकते. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd T20I 2025: चेन्नईत 7 वर्षांनी होणार टी-20 आंतरराष्ट्रीय सामना, कसा आहे तिथे टीम इंडियाचा रेकाॅर्ड? वाचा सविस्तर)

मोहम्मद शमी दुसऱ्या टी-20 मधूनही का पडू शकतो बाहेर?

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मध्ये, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने तीन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे शमीला वगळण्यात आले. तीन फिरकी गोलंदाजांव्यतिरिक्त, अर्शदीप सिंगच्या रूपात फक्त एकच मुख्य वेगवान गोलंदाज संघात समाविष्ट करण्यात आला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पाठिंबा देते हे सर्वांनाच माहिती आहे, अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.

जर चेन्नईमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20 मध्ये तीन फिरकीपटूंना संधी मिळाली, तर टीम इंडिया त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकते. टीम इंडियाने ईडन गार्डन्सवर पहिला टी-20 खेळलेला प्लेइंग इलेव्हन चेन्नईमध्येही पाहता येईल.

चेन्नई टी-20 साठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

शमी गेल्या 14 महिन्यांपासून टीम इंडियाबाहेर

शमी गेल्या 14 महिन्यांपासून टीम इंडियाबाहेर आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला. शमीने देशांतर्गत क्रिकेटद्वारे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे, परंतु टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन अजूनही प्रलंबित आहे. इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यातून शमी टीम इंडियामध्ये परतेल असा अंदाज वर्तवला जात होता, पण तसे झाले नाही.