Yashpal Sharma Dies: कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या (India) विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले माजी भारतीय फलंदाज यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. यशपाल 66 वर्षाचे होते. यशपालने 37 एकदिवसीय आणि 42 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच 1979-83 दरम्यान ते भारतीय मधल्या फळीतील महत्त्वाचा भाग होता. शिवाय त्यांनी दोन वर्षे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणून काम केले आणि 2008 मध्ये त्यांची पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते तर 28.48 च्या सरासरीने 883 धावा फटकावल्या.
रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी हरियाणा आणि रेल्वेसह एकूण तीन संघांचे प्रतिनिधित्व केले असून यशपालने 160 सामने खेळत 8, 933 धावा केल्या ज्यामध्ये 21 शतक आणि सर्वाधिक नाबाद 201 धावांचाही समावेश होता. 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा ते क्रीजवर आले तेव्हा संघाची धावसंख्या तीन बाद 76 अशी होती, जी लवकरच पाच बाद 141 अशी झाली. शर्मा यांनी 120 चेंडूंत 89 धावांची खेळी खेळली. त्यांनी केवळ चांगले फटके मारले नाहीत तर विकेट्सदरम्यानही धावा लुटल्या. मागील दोन विश्वचषकात खराब कामगिरी करणाऱ्या भारतीय संघ पहिले फलंदाजीसाठी उतरला. आणि त्याचा निर्णय जवळजवळ योग्य असल्याचे दिसून आले. पण 76 धावांवर तीन विकेट्स गमावल्यावर शर्मा मैदानावर उतरले. त्यानंतर 141 धावांवर अर्धा संघ तंबूत परतला होता पण शर्माने संयम कायम ठेवला. यशपाल शर्माने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 120 चेंडूंचा सामना करत भारतीय डाव सांभाळला. एकट्या यशपाल यांनी 9 चौकार खेच 89 धावा केल्या आणि भारताला निर्धारित 60 ओव्हरमध्ये 262/8 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली.
याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक 40 असो किंवा कठीण परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध 61 धावांची खेळी, शर्माने या स्पर्धेत 34.28 च्या सरासरीने 240 धावा केल्या. निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय), पंजाब आणि हरियाणा क्रिकेटमध्ये विविध भूमिकांमध्ये सक्रिय योगदान दिले होते.