रोहित शर्मा (Photo: twitter)

सध्या क्रिकेट सामन्यांमध्ये व्यस्त असलेला भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सामना सुरु असताना एका चाहत्याने मैदानात धावत येऊन रोहित शर्माचे पाय धरले. अचानक चाहत्याने पाय धरल्यामुळे रोहित गोंधळला. पण हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजय हजारे चषकासाठी रोहित शर्मा मुंबईकडून खेळत आहे. रविवारी मुंबई आणि बिहार यांच्यात सामना रंगलेला असताना हा प्रकार घडला. सामन्यात रोहित शर्मा 21 धावांवर खेळत असताना एक चाहता मैदानावर आला. त्याने रोहितच्या पायावर चक्क डोके टेकवले आणि आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे रोहित शर्मा काहीसा गोंधळला. पण रोहितने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने रोहितची गळाभेट घेण्याचाही प्रयत्न केला.

क्रिकेटच्या मैदानावर जाऊन क्रिकेटर्सला भेटण्याची चाहत्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, एस. एस. धोनी या खेळाडूंसोबतही असा प्रसंग घडला आहे.

विजय हजारे चषकात उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईच्या संघाने बिहारचा 9 विकेट्सने पराभव केला. बिहार संघाला 69 धावांतच आपला खेळ आटपावा लागला. तुषार देशपांडेच्या जबरदस्त बॉलिंगने 23 धावात 5 विकेट्स घेतल्या. तर रोहित शर्माने या सामन्यात 33 धावांची नाबाद खेळी केली. विजय हजारे चषकाच्या उपांत्य फेरीत मुंबई आणि दिल्ली संघाने प्रवेश केला आहे.