Faf Du Plessis Injury Update: फाफ डु प्लेसिसच्या स्मृतीवर परिणाम, पाकिस्तान सुपर लीग संघातील खेळाडूशी झाली होती धडक
फाफ डु प्लेसिस दुखापत अपडेट (Photo Credit: Twitter)

Faf Du Plessis Health Update: शनिवारी अबू धाबी (Abu Dhabi) येथे झालेल्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) टी-20 सामन्यादरम्यान आपल्याच संघातील खेळाडूशी क्षेत्ररक्षण करताना धडक होऊन जखमी झालेल्या फाफ डु प्लेसिसने रविवारी आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली. फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) म्हणाला की, कन्क्शननंतर त्याला काही प्रमाणात ‘मेमरी लॉस’चा त्रास झाला आहे परंतु लवकरच मैदानात परतण्याचा त्याने विश्वास व्यक्त केला आहे. क्वेटा ग्लेडिएटर्स (Quetta Gladiators) कडून खेळणाऱ्या डु प्लेसिस पेशावर झल्मीविरुद्ध (Peshawar Zalmi) सामन्यात क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघातील मोहम्मद हसनैनशी अनवधानाने धडक बसली. या घटनेनंतर ड्यूप्लेसिस मैदानावर कोसळला आणि काही मिनिटे एकाच जागी पडून होता. या घटनेनंतर प्राथमिक उपचारानंतर डु प्लेसिस डगआऊटकडे परतला आणि त्याला नंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलामीवीर सईम अयूबने कन्क्शन सबटिट्यूट म्हणून डु प्लेसिसची जागा घेतली.

“समर्थनाच्या सर्व संदेशाबद्दल सर्वांचे आभार” असे माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधार डु प्लेसिस ने रविवारी ट्विट केले. “मी परत हॉटेलमध्ये परतलो आहे. काही स्मरणशक्ती गमावली आहे पण मी ठीक होईल. आशा आहे की लवकरच मैदानावर परत येईन.” पेशावरच्या डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये बाउंड्री लाईन जवंजाळ चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात डु प्लेसिसचे डोके हसनैनच्या गुडघ्यावर आदळले. डु प्लेसिसच्या उजव्या कानाखाली मानेवरील भागामध्ये सूज आल्याने तो डगआऊटमध्ये परतला. दरम्यान, मंगळवारी पुढच्या सामन्यात क्वेटा संघाचा सामना लाहोर कलंदरशी होईल.

फाफ डु प्लेसिस

उल्लेखनीय म्हणजे, सध्या सात सामन्यात केवळ एकी विजय मिळवत पॉईंट टेबलच्या तळाशी असलेल्या ग्लेडिएटर्सला सलग दुसर्‍या सामन्यात कन्सक्शन विकल्प वापरावा लागला. मागील सामन्यात अँडी रसेलच्या हेल्मेटवर वेगवान चेंडू आढळला होता. रसेलला फिजिओने तपासणी केली व त्याला फलंदाजीची परवानगी दिली परंतु पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याला रूग्णालयात नेण्यात आले आणि नसीम शाह कन्क्शन पर्याय म्हणून मैदानात उतरला. 15 जून 2021 रोजी (मंगळवार) लाहोर कलंदरस विरोधातील सामन्यात रसेल आणि डु प्लेसिस संघात पुनरागमन करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.