रोहित शर्मा (Rohit Sharma) दीर्घकालीन कर्णधारपदाचा पर्याय असू शकत नाही, असे मत भारताचे (India) माजी निवडकर्ते आणि क्रिकेटपटू सरनदीप सिंह (Sarandeep Singh) यांनी व्यक्त केले आहे. रोहित युएई येथे आयोजित टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेनंतर विराट कोहलीकडून (Virat Kohli) भारताच्या T20I संघाची धुरा आपल्या हाती घेऊ शकतो. “रोहित हा चांगला पर्याय आहे (व्हाईट बॉल कर्णधारपदासाठी), तो तुमच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. पण निवड समितीने त्याला दोन वर्षांसाठी (2023 वनडे विश्वचषकपर्यंत) कर्णधार बनवायचे की दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकेल असा नेता शोधायचा आहे याचा निर्णय घ्यावा,” सरनदीपने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. विश्वचषकानंतर कोहली टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होणार असून त्याच्या जागी रोहितची वर्णी लागणार आहे. आता एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि सरनदीपने सांगितले की, रोहित या पदासाठी योग्य आहे, परंतु तो ही भूमिका अल्प कालावधीसाठीच बजावू शकेल. (IND vs AFG, ICC T20 World Cup 2021: ‘हिटमॅन’ रोहित शर्माची आक्रमक फलंदाजी, अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले 23 वे टी-20 अर्धशतक)
“जर तुम्ही भविष्याचा विचार करत असाल तर केएल राहुल आणि रिषभ पंत हे चांगले पर्याय आहेत,” सरनदीप यांनी पुढे म्हटले. एका रिपोर्टनुसार, टी-20 विश्वचषक 2021 नंतर टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे आणि त्यासाठी रोहित शर्माला भारताचा कर्णधार बनवले जाऊ शकते. याशिवाय बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या निवड समितीमध्ये काही दिवसांनी होणाऱ्या बैठकीत विराट कोहलीच्या वनडे कर्णधारपदाच्या भवितव्यावर देखील चर्चा होऊ शकते. एकदिवसीय आणि टी-20 संघासाठी एकच कर्णधार असला पाहिजे, तर कसोटीसाठी वेगळा कर्णधार असावा असे बीसीसीआयचे मत आहे. अशा परिस्थितीत असे मानले जात आहे की मर्यादित फॉरमॅटसाठी रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते तर विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार राहू शकतो. रोहितशिवाय केएल राहुलही कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषकात ज्या प्रकारे फ्लॉप झाला आहे त्यानंतर आता वनडे संघाच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना वगळणे धक्कादायक असल्याचे सरनदीपने सांगितले. हार्दिक पांड्या नियमितपणे गोलंदाजी करण्यासाठी पुरेसा तंदुरुस्त नसताना त्याचा संघात समावेश का करण्यात आला, असा सवालही माजी भारतीय निवड समिती अध्यक्षने केला आहे. शार्दुल ठाकूरला न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारच्या जागी संधी मिळाली जी सरनदीपच्या मते एक मोठी चूक होती.