Harry Brook (Photo Credit - Twitter)

न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (24 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे सुरू झाला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या दिवशी तीन विकेट्सवर 315 धावा केल्या होत्या. त्यांचा युवा स्टार हॅरी ब्रूक 169 चेंडूत 184 धावांवर नाबाद आहे. त्याचवेळी अनुभवी फलंदाज जो रूटने 182 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या आहेत. या सामन्यात न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. त्यांनी 21 धावांवर इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले. मॅट हेन्रीने जॅक क्रॉलीला टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केले. क्रॉली 12 चेंडूत दोन धावा करून बाद झाला. यानंतर ओली पोप पॅव्हेलियनमध्ये परतला. पोपलाही हेन्रीने बाद केले. त्याचा झेल मायकेल ब्रासवेलने घेतला. ओली पोपने सहा चेंडूत 10 धावा केल्या. बेन डकेट 21 चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. त्याला टीम साऊदीने ब्रेसवेलच्या हाती झेलबाद केले.

रूट आणि ब्रूक यांनी 294 धावांची केली भागीदारी

तीन विकेट पडल्यानंतर ब्रूकने जो रूटसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 294 धावांची भागीदारी केली. ब्रुकने आपल्या डावात भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीचा 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. तो नऊ डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. (हे देखील वाचा: IPL 2023 आधी कर्णधार Hardik Pandya ची वाढली चिंता! 'हा' डॅशिंग खेळाडू संपूर्ण हंगामातून पडू शकतो बाहेर)

गावस्कर या बाबतीत ब्रुकच्या पुढे आहेत

कांबळीने पहिल्या नऊ डावात 798 धावा केल्या. ब्रूकने त्यांना मागे टाकत 807 धावा केल्या आहेत. या यादीत कांबळीनंतर इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ (780 धावा), भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर (778 धावा) आणि एव्हर्टन वीक्स (777 धावा) यांचा क्रमांक लागतो. ब्रूकने 100.88 च्या सरासरीने 807 धावा केल्या आहेत. फक्त गावस्कर यांनी नऊ डावांमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त सरासरी घेतली. गावस्करने 129.66 च्या सरासरीने 778 धावा केल्या.