James Anderson 1K FC Wickets: दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गाठला 1000 विकेट्सचा पल्ला, 7 ओव्हरमध्ये केले 5 शिकार
जेम्स अँडरसन | File Image (Photo Credit: Getty Images)

James Anderson 1K FC Wickets: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) सोमवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या 1000 विकेट्सचा पल्ला गाठला. एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे लंकाशायर (Lancashire) कडून खेळत केंट (Kent) विरोधात सुरू असलेल्या काऊन्टी सामन्यात या अनुभवी वेगवान गोलंदाजाने हा कारनामा केला आहे. अँडरसनने झॅक क्रॉली, जॉर्डन कॉक्स, ओलिवर रॉबिन्सन, जॅक लेनिंग, हेनो कुन (Heino Kuhn), मॅट मिलनेस आणि हॅरी पॉडमोर यांना बाद करत केंट संघाला पहिल्या डावात 74 धावांवर गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली. हेनो कुन या दिग्गज गोलंदाजाचा 1000वा शिकार बनला. अँडरसनने 7/19 अशी कारकीर्दीतील सर्वोत्तम आकडेवारीची नोंद केली आणि आता रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1002 विकेट्स झाल्या आहेत. (ENG vs NZ 2nd Test: 162 नॉट आऊट! एडबॅस्टन कसोटी सामन्यात James Anderson ने रचला इतिहास, सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा इंग्लिश क्रिकेटर)

आपल्या 262 व्या प्रथम श्रेणी सामन्यात अँडरसनने 7 ओव्हरमध्ये केवळ 3 धावा देऊन पाच विकेट्स घेतले. यादरम्यान अँडरसनने 5 मेडन ओव्हरही फेकली. या शतकातील अँडरसन 1000 प्रथम श्रेणी विकेट्स घेणारा 14 वा खेळाडू ठरला आहे. तसेच अँडी कॅडिक, मार्टिन बिक्नल, डेव्हॉन मॅकलम, आणि वसीम अकरम यांच्यानंतर हा पराक्रम करणारा पाचवा वेगवान गोलंदाज बनला आहे. दरम्यान, टेस्ट क्रिकेटमध्ये अँडरसनने इंग्लंडसाठी 162 सामन्यात 26.67  च्या सरासरीने 617 विकेट्स घेतल्या आहेत. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या अँडरसनने किरकोळ दुखापतींशी झुंज देऊनही गेल्या काही वर्षांत आपली उत्तम कामगिरी बजावली आहे.

दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा अँडरसन एकमेव वेगवान गोलंदाज आहे. त्याने खेळाच्या प्रदीर्घ स्वरुपात आजवर 617 गडी बाद केले आहेत. अँडरसनने 2003 मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पण केले होते. अँडरसन सध्या 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेची तयारी करत व्यस्त आहे. जो रूटच्या नेतृत्वात इंग्लंड आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान विराट कोहलीच्या टीम इंडियाचा सामना करतील.