क्रिस वोक्स आणि मोहम्मद रिझवान (Photo Credit: Twitter/ICC)

पहिल्या डावात 107 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर वेगवान गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी दुसर्‍या डावात पाकिस्तानच्या (Pakistan) आठ फलंदाजांना बाद केले आणि इंग्लंडला (England) शुक्रवारी पहिल्या क्रिकेट कसोटीच्या तिसर्‍या दिवशी सामन्यात पुनरागमन करून दिले. पाकिस्तानच्या पहिल्या डावात 326 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 219 धावांवर संपुष्टात आला आणि पाहुण्या संघाला पहिल्या डावात 107 धावांची आघाडी मिळाली. पाकिस्तानकडून लेगस्पिनर यासिर शहाने (Yasir Shah) चार आणि शादाब खानने दोन गडी बाद केले, परंतु गोलंदाजांची मेहनत फलंदाजांनी वाया घालवली. इंग्लंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा दुसरा डाव कोसळला. त्यांनी 137 धावांवर आठ विकेट गमावले आणि आता दोन दिवस बाकी असताना त्यांच्याकडे एकूण 244 धावांची आघाडी आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यासिर शाह 12 आणि मोहम्मद अब्बास (Mohammad Abbas) खाते उघडता क्रीजवर खेळत आहेत. (ENG vs PAK 1st Test: पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने 12 व खेळाडू म्हणून उचलले बूट; विराट कोहली, एमएस धोनीशी तुलना करत यूजर्सकडून कौतुक)

पहिल्या डावात कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट शतक झळकावणारा सलामी फलंदाज शान मसूदला स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या ओव्हरमध्ये खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. क्रिस वोक्सने कर्णधार अझर अली (18) आणि बाबर आझम (पाच) यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवले. डॉम बेसने आबिद अलीला बाद केले, ज्याचा झेल वोक्सने पकडला. असद शफीक 29 धावा काढून बाद झाला. इंग्लंडकडून ब्रॉड, वोक्स आणि स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट मिळवले. यापूर्वी 62 धावा काढून बाद झालेल्या ओली पोप शिवाय अन्य इंग्लंड फलंदाजांनी निराश केले. दुसर्‍या दिवशी इंग्लंडने 92 धावांत चार गडी गमावले आणि त्यानंतर पोपने डाव हाताळला.

काल तो 46 धावांवर नाबाद होता, पण पाचवे अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याने आपली विकेट गमावली. पहिल्या तासात फलंदाजीद्वारे केवळ 9 धावा केल्या तर 10 अतिरिक्त धावा होत्या. नसीम शाहने पोपला प्रचंड त्रास दिला, तर मोहम्मद अब्बास जोस बटलरची विकेट तीन वेळा घेण्याच्या जवळ पोहचला. ड्रिंक्स ब्रेकनंतर इंग्लंड फलंदाजांनी उत्तम खेळ करायला सुरुवात केली आणि पाचव्या विकेटसाठी या जोडीने 65 धावांची भागीदारी केली. नसीमने ही भागीदारी मोडली आणि पोपला झेलबाद केले.