ENG vs NZ, T20 World Cup Semi-Final: इंग्लंड विरोधात मोठा उलटफेर करण्यासाठी न्यूझीलंड सज्ज, ‘हे’ खेळाडू ठरणार गेमचेंजर
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

T20 WC 2021 Semi-Final: बुधवारी अबु धाबी (Abu Dhabi) येथे आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत टूर्नामेंट जेतेपदाचे प्रबळ दावेदार इंग्‍लंडची (England) गाठ न्यूझीलंडशी (New Zealand) आहे. यापूर्वी किवी खेळाडू स्पर्धेत मोठा फेरबदल करण्यासाठी सज्ज आहे. सुपर 12 टप्प्यातील पाच सामन्यांमध्ये चार विजय नोंदवून इंग्लंड बाद फेरीत पोहोचला आहे. उल्लेखनीय म्हणजे किवी संघाने देखील चार सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. मात्र, इंग्लिश खेळाडू या स्पर्धेत अधिक खात्री देणारा संघ ठरला आहे. अबू धाबी येथे दोन्ही संघात पहिल्या सेमीफायनलचा ‘महासंग्राम’ रंगणार आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी इंग्लंड-न्यूझीलंडकडे ही अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू आपल्या परीने पूर्ण दम लावून खेळ करतील. इंग्लंड संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे किवी संघातील ‘हे’ खेळाडू त्यांच्यासाठी गेमचेंजर ठरू शकतात. (T20 World Cup 2021 Semi-Final Schedule: टी20 विश्वचषक उपांत्य फेरीत कोणता संघ कोणाशी भिडणार? जाणून घ्या संपूर्ण शेड्युल)

1. ट्रेंट बोल्ट (Trent Boult)

किवी वेगवान गोलंदाज बोल्ट संघाचा मुख्य बॉलर आहे. बोल्टने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 11 विकेट घेतल्या आहेत. शिवाय पॉवर-प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये बोल्ट बराच घातक ठरला आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्ध सुरुवातीला आणि अंतिम षटकात बोल्ट किवी संघासाठी विकेट घेण्यासाठी मुख्य खेळाडू असेल.

2. मार्टिन गप्टिल (Martin Guptill)

न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर गप्टिल सध्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गप्टिलने 5 सामन्यात सर्वाधिक 176 धावा केल्या आहेत. यादरम्यान 93 त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. इयन मॉर्गनच्या ब्रिटिश संघाविरुद्ध गप्टिलवर सलामीला जोरदार धावा लुटण्याची जबाबदारी असेल.

3. डॅरिल मिशेल (Daryl Mitchell)

किवी संघाचा दुसरा सलामीवीर डॅरिल मिशेल यंदाच्या स्पर्धेत त्यांचा दुसरा मुख्य फलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात फ्लॉप ठरल्यावर मिशेलने जबरदस्त पुनरागमन केले आणि 5 सामन्यात एकूण 125 धावा केल्या. यादरम्यान त्याने भारताविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात 49 धावांची संयमी खेळी केली ज्यामुळे संघाने बलाढ्य टीम इंडियावर आठ विकेटने मात केली. पहिले फलंदाजी करताना किंवा धावांचा पाठलाग करताना मिशेलची आक्रमक बॅटिंग किवी संघासाठी गेमचेंजर ठरू शकते.

4. ईश सोढी (Ish Sodhi)

अबू धाबीच्या फिरकीसाठी प्रभावी खेळपट्टीवर किवी संघाचा हा अनुभवी फिरकीपटू घातक ठरू शकतो. सोढी स्पर्धेत गरजेच्या वेळी संघाच्या कामी आला आहे. त्याने आतापर्यंत एकूण 8 विकेट घेतल्या आहेत. सोढीची फिरकी जर इंग्लंड फलंदाजांविरुद्ध यशस्वी ठरली तर तो उपयुक्त ठरू शकतो.