CSK vs RCB in IPL 2021: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderbad) कर्णधार आणि सलामी फलंदाज डेविड वॉर्नरने (David Warner) बुधवार, 28 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (Chennai Supers Kings) सामन्यात अर्धशतक ठोकून विशेष विक्रम नोंदवला आहे. वॉर्नरने 55 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 57 धावांची हळू पण महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले. डेविड वॉर्नरचे आयपीएलमधील हे 50 वे अर्धशतक आहे. यासह आयपीएलमध्ये (IPL) 50 अर्धशतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला. वॉर्नरच्या मागे या प्रकरणात दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन आहे, ज्याने आयपीएलमध्ये 43 अर्धशतके झळकावली आहेत. वॉर्नरने 50 अर्धशतकांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये चार शतकेही ठोकली आहेत. आरसीबी कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये 40 अर्धशतकांसह या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. (IPL 2021: आयपीएलमध्ये ‘या’ 3 खेळाडूंनी चोपल्या सर्वात वेगवान 5000 धावा, कोण आहेत हे खेळाडू वाचा)
याशिवाय वॉर्नरने टी -20 क्रिकेटमध्येही 10 हजार धावा पूर्ण केल्या. वॉर्नरने आपल्या डावात 40वी धाव घेताच क्रिस गेलसह तडाखेबाज टी-20 फलंदाजांच्या एलिट यादीत प्रवेश केला आहे. गेल, कीरोन पोलार्ड आणि शोएब मलिक यांनी वॉर्नरपूर्वी ही कमाल केली आहे. गेलच्या नावावर 13839 धावा तर पोलार्ड 10694 आणि मलिक 10488 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे वॉर्नरने 303 टी-20 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत, जे गेलनंतर सर्वात वेगवान आहे. गेलने अवघ्या 285 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. दरम्यान, वॉर्नरने आयपीएलमध्ये 50 चेंडूंत 50 वे अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरचे या स्पर्धेतील हे सर्वात स्लो अर्धशतक आहे. दुसरीकडे, वॉर्नरने आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या अनावर केला आहे.
वॉर्नर आयपीएलमध्ये 200 षटकार लागवणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये आपले 200 षटकारही पूर्ण केले. आयपीएलमध्ये हा आकडा गाठणारा तो चौथा परदेशी आणि आठवा एकूण खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली, सुरेश रैना आणि कीरोन पोलार्ड यांनी आयपीएलमध्ये हा कारनामा केलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू आहे. लीगमध्ये त्याने 5,000 हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत आणि आयपीएलमध्ये सातत्याने धावा करणारा फलंदाज आहे.