Chennai Super Kings vs Mumbai Indians | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad) हा आयपीएल (IPL 2024) सामना पाहताना दोन्ही संघाचे वेगवेगळे समर्थक आपसांत भिडले आणि मुद्द्यांवरची लढाई थेट गुद्द्यांवर आली. परिणामी या वेळी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. 'लोकमत टाईम्स' ने दिलेल्या वृत्तानुसार, MI Vs SRH सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने आनंद साजरा केला. ज्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना राग आला. त्या रागाच्या भरात त्यांनी केलेल्या मारहाणीत सीएसकेचे चाहते बंडोपंत बापुसो तिबिले (63) गंभर जखमी झाले. ही घटना कोल्हापूर (Kolhapur) येथील हणमंतवाडी परिसरात बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास घडली. या प्रकरणाची दखल घेऊन करवीर पोलिसांनी बळवंत महादेव झांजगे (50) आणि सागर सदाशिव झांजगे (35, दोघे रा. हणमंतवाडी) या दोघांना अटक केली आहे.

करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, बुधवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा आयपीएल सामना सुरु होता. आरोपी आणि पीडित हे एका घरात आयपीएल सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहात होते. दोन्ही आरोपी मुंबई इंडियन्स संघाचे चाहते आहेत. सामन्यादरम्यान हैदराबाद संघ सामन्यात वरचढ ठरत होता. या संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्याने ते संतप्त झाले होते. दरम्यान, रोहित शर्मा बाद झाला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा चाहता बंडोपंत तिबिले यांनी "रोहित शर्मा गेला आता मुंबई कशी जिंकणार?" असे उद्गार काढले. ज्यामुळे आरोपींचा पारा आणखीच चढला आणि त्यांनी तिबीले यांना काठीणे मारहाण करण्यास सुरुवात केली, असे माध्यमसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, आरोपींनी केलेल्या मारहाणीत तिबिले गंभीर जखमी झाले. काठीचा टोला लागल्याने त्यांचे डोके फुटले आणि रस्तस्त्राव सुरु झाला. त्यातच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. सीपीआर येथील डॉक्टरांनी उपचार करताना सांगितले की, तिबीले यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत, अशी माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, जखमी बळवंत तिबीले यांचे बधू संजय तिबीले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिबीले यांनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आयपीएल सामना पाहताना संघाचा कट्टर समर्थक होऊन प्रतिस्पर्धी संघाच्या चाहत्यावर हल्ला करण्याच्या घटनेमुळे पोलीसही अवाक झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक युनूस इनामदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.