एमएस धोनी याच्या एका निर्णयाने बदलला रोहित शर्मा याचा करिअर, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळाली होती दुसरी संधी
रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 दुहेरी शतकं, वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा हे विक्रम टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर आहे. विराट कोहली, एमएस धोनी (MS Dhoni) यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या मधे 'हिटमॅन' नावाने प्रसिद्ध रोहितने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोहितकडे अतुलनीय प्रतिभा आहे यात शंका नाही पण त्याची प्रतिभा पहिले ओळखली ते धोनीने. 'कॅप्टन कूल' धोनीने 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) दरम्यान असा एक निर्णय घेतला ज्याने रोहितचा संपूर्ण करिअर बदलून टाकला. सलामी फलंदाज म्हणून रोहितने सर्व यश साध्य केले ज्याचे स्वप्न अनेक खेळाडू पाहतातच पण खेळाडूला एका संधीची गरज असते आणि धोनीने रोहितला ती संधी दिली. रोहित कारकिर्दीच्या सुरुवातीला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. इथे त्याला इतके यश मिळाले नाही. यानंतर कर्णधार धोनीने त्याच्या कडून डावाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. (एमएस धोनी याने एकाच देशाविरुद्ध झळकावले आहे पहिले टेस्ट आणि वनडे शतक; स्कोअरमध्ये देखील होते साम्य, पाहा हे आकडे)

धोनीने पहिल्यांदा रोहितला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2011 मध्ये केप टाऊनमध्ये सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरवले होते. या वेळेस तो केवळ 23, 1 आणि 5 धावाच करू शकला. यानंतर रोहितला पुन्हा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पाठविण्यात आले. दोन वर्ष लोअर ऑर्डरमध्ये खेळल्यानंतर रोहितवर धोनीने पुन्हा दाव खेळला आणि या संधीचा फायदा घेत रोहितने एक नवीन कथा लिहिली. 2013 इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत रोहितला तत्कालीन कर्णधार धोनीने सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. रोहितने निराश केले नाही आणि डावात 83 धावा केल्या. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये रोहित चमकला आणि टीम इंडियाचा नियमित सलामी फलंदाज बनला.

रोहितने सलामी फलंदाज म्हणून 138 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने सात हजारहुन अधिक धावा केल्या आहेत. सलामीवीर म्हणून रोहितने एकदिवसीय सामन्यात रेकॉर्ड तीन दुहेरी शतकांसह 29 शतकं ठोकली आहेत. रोहितने 2007 मध्ये डेब्यू केले होते, पण 2013 मध्ये डावाची सुरुवात केल्यापासून 'हिटमॅन' बनण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे.