Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांनी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांचे मुंबई लोकल ट्रेनमध्येच केले नामकरण
Balasaheb Thackeray and sunil Sunil Gavaskar | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Bal Thackeray Birth Anniversary:  बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) म्हणजे एकाच वेळी भिन्न स्वभावाचे अनेकविध पैलूंचे मिश्रण असलेले व्यक्तिमत्व. ते हायात असताना आणि नसतानाही नेतृत्व आणि स्वभाववैशिष्ट्य यांमुळे ते लोकांच्या नेहमीच स्मरणात राहिले. आजही त्यांच्या जयंती, पुन्यतिथीला त्यांना अभिवादन करण्यासाठी जमा होणारी गर्दी जनमानसावरील गारुडच सिद्ध करते. त्यांचा लोकसंग्रह जितका दांडगा होता तितकाच त्यांचा लोकसंपर्गही दांडगा होता. त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर होताच. पण, नानावीध क्षेत्रांतील दिग्गज मंडळीशीही त्यांची खास मैत्री होती. क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Cricketer Sunil Gavaskar ) हेसुद्धा अशाच मंडळींपैकी. दोघांची कार्यक्षेत्रे भिन्न असूनही दोघांमध्ये स्नेह कायम होता. आपापल्या क्षेत्रात व्यग्र असल्यामुले बाळासाहेब आणि सुनिल गावसकर यांच्यात थेट भेटी फार दुर्मिळ असायच्या पण, फोनवरील गप्पा मात्र सदैव कायम असायच्या. बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना गावसकर हे बाळासाहेबांनी त्यांचे कसे नामकरण केले याची आठवण आवर्जून सांगतात. (हेही वाचा, ..जेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, 'संज्या, फिकर मत कर', 'कमळीची चिंता करु नका')

खरे तर गोष्ट तशी जूनी. काही वर्षांपूर्वीची. सुनिल गावसकर यांना बाळासाहेब ठाकरे यांनी 'मामाचा भाचा' असे नाव दिले होते. या नावाचीही एक कहाणी आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे मुंबई लोकलने प्रवास करत होते. (त्या काळी राजकीय नेते लोकलने प्रवास करत असत.) हा काळ अगदी सुरुवातीचा आहे. म्हणजे शिवसेना नुकतीच स्थापन झाल्याचा किंवा बाळासाहेबांनी फ्री प्रेस जर्नल सोडल्याचा. तर, ज्या लोकल ट्रेनने बाळासाहेब प्रवास करत होते योगायोगाने त्याच डब्यात सुनिल गावसकर यांनीही प्रवेश केला. गावसकर हे तेव्हा मुंबईतून क्रिकेट खेळायचे आणि क्रिकेट प्रेमींना ते चांगलेच परिचित होते. दरम्यान, गावसकर यांना पाहताच बाळासाहेब म्हणाले. या 'मामाचा भाचा' काय? बाळासाहेबंनी गावसकर यांना 'मामाचा भाचा' म्हटल्याचे बहुदा त्या डब्यातील त्यांना ओळखणाऱ्या कोणीतरी ऐकले असावे. पुढे सुनिल गावसकर खेळण्यासाठी जेव्हा जेव्हा मुंबईतील स्टेडीयमवर येत तेव्हा मैदानाबाहेरच्या गॅलरीतून काही मंडळी नेहमी त्यांचा उल्लेख 'मामाचा भाचा' असा करत असत.

आता बाळासाहेब गावसकर यांना थेट 'मामाचा भाचा' असे का म्हटले असावेत? हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. तर त्यामागची गंमत अशी की, गावसकर यांचे मामा माधव मंत्री हे बाळासाहेबांचे घनिष्ट मित्र होते. त्यामुळे मामांसोबत त्यांनी भाच्याला (गावसकर) कधीमधी पाहिले होते. त्यामुळे सुरुवातीला बाळासाहेबांचा गावसकर यांच्यासोबत फारसा स्नेह जुळला नसला तरी, बऱ्यापैकी परिचय होता. त्यामुळे तो संदर्भ घेऊन बाळासाहेबांनी गावसकर यांचे ट्रेनमध्येच नामकरण केले.